टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड हा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) महाराजा T20 ट्रॉफीमध्ये खेळत आहे. समित म्हैसूर वॉरियर्स संघाच भाग आहे.
महाराजा T20 ट्रॉफीचा चौथा सामना बेंगळुरू ब्लास्टर्स आणि म्हैसूर वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात म्हैसूरचा समित द्रविड हा जबरदस्त शैलीत फलंदाजी करताना दिसला. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये सिक्सर मारताना दिसत आहे. त्याचा फटका पाहून समालोचकही त्याची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
या सामन्यात बेंगळुरू ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र पावसामुळे सामना १८ षटकांचा करण्यात आला. मनोज भंडगे (५८*) आणि हर्षिल धर्मानी (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वॉरियर्सने १८ षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या.
धावांचा पाठलाग करताना समित चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा वॉरियर्सची धावसंख्या ४.५ षटकांत २ बाद ५१ धावा होती. उजव्या हाताच्या फलंदाजाने वेगवान गोलंदाज गणेशवर नवीनच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकून प्रेक्षकांना थक्क केले. सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीनने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट चेंडू टाकला.
समितने तो चेंडू लाँग-ऑन बाऊंड्रीवरून प्रेक्षकांमध्ये पाठवला. रोहित शर्माने २०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानच्या नवीन उल हकविरुद्ध असाच षटकार मारला होता.
समित षटकाच्या पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्याने ७ धावा केल्या. अखेरीस, वॉरियर्सने १७.१ षटकांत १८३ धावांचे लक्ष्य पार केले आणि ४ विकेट्स राखून विजय मिळवला. भुवन राजूने ५१ धावा करत फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली.
१८ वर्षीय अष्टपैलू समितला वॉरियर्सने महाराजा T20 ट्रॉफी लिलावात त्याच्या ५० हजार रूपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. महाराजा T20 ट्रॉफीच्या म्हैसूर वॉरियर्सच्या सलामीच्या सामन्यातही समित द्रविड ७ धावांवर बाद झाला होता.