मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपमधून कोणाचाही पत्त कट होऊ शकतो; हेड कोच द्रविडच्या वक्तव्यानं वाढलं टेन्शन

T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपमधून कोणाचाही पत्त कट होऊ शकतो; हेड कोच द्रविडच्या वक्तव्यानं वाढलं टेन्शन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2024 05:44 PM IST

T20 World Cup 2024 : भारतीय संघाचे खेळाडू आता थेट आयपीएलमध्येच टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. आयपीएलच्या कामगिरीवरून टी-20 वर्ल्डकपचा संघ निश्चित होऊ शकतो.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (PTI)

Rahul Dravid On T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्डकपला आता केवळ ५ महिन्यांचा कालावधी उरला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा वर्ल्डकप खेळला जाणार आहे. तर टी-20 वर्ल्डकपआधी भारताने शेवटची टी-20 मालिका देखील खेळली आहे. या मालिकेतून टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला काही प्रश्नांची उत्तरेही मिळाली आहेत.

भारतीय संघाचे खेळाडू आता थेट आयपीएलमध्येच टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. आयपीएलच्या कामगिरीवरून टी-20 वर्ल्डकपचा संघ निश्चित होऊ शकतो. तत्पूर्वी, भारताने अफगानिस्तानविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली आहे.

या मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर हेड कोच राहुल द्रविडने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. द्रविडने सांगितले की, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे, अफगाणिस्तान आणि त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. कारण संघातील काही वरिष्ठ आणि नियमित खेळाडू विश्रांतीकिंवा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होते. 

अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचा फायदा घेत युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आगामी टी-20 विश्वचषकासाठी पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले. यामुळे टी-20 वर्ल्डकपसाठी अद्याप कोणत्याही खेळाडूची जागा निश्चित नाही.

अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी-20 सामना जिंकल्यानंतर द्रविड म्हणाला, "एकदिवसीय विश्वचषकानंतर टी-20 आणि वनडे मालिकांमध्ये वेगवेगळे खेळाडू खेळले. याची अनेक कारणे होती. पण आमच्याकडे अनेक पर्याय आहेत ही चांगली गोष्ट आहे."

द्रविड पुढे म्हणाला, "आम्हाला काही पैलूंवर काम करावे लागेल आणि त्यावर विचार करत आहोत. एक संघ म्हणून आम्हाला इतके सामने खेळावे लागणार नाहीत. आयपीएल आहे, आयपीएलमध्ये या खेळाडूंवर नजर असेल."

शिवम दुबेच्या कामगिरीवर राहुल द्रविड खूश

शिवम दुबेबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, “तो खूप दिवसांनी परतला आहे आणि पूर्वीपेक्षा चांगला खेळाडू म्हणून परतला आहे. त्याच्याकडे नेहमीच प्रतिभा होती. मी त्याच्या कामगिरीवर खूप आनंदी आहे. पुनरागमनाच्या मालिकेत तो 'प्लेअर ऑफ द सिरीज' बनला आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढला असेल'.

विकेटकीपिंगमध्येही अनेक पर्याय आहेत

याशिवाय विकेटकीपिंगच्या पर्यायांबद्दल हेड कोच द्रविड म्हणाला की, "आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. संजू, किशन आणि ऋषभ हे सगळेच आहेत. आता पुढील काही महिन्यांत काय परिस्थिती असते ते पाहावे लागेल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. "

WhatsApp channel