भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या एका धाडसी निर्णयाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. द्रविडने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून मिळणारा बोनस कमी केला आहे. वास्तविक, द्रविडला टी-20 वर्ल्डकप वर्ल्डकप जिंकल्यानंतर ५ कोटी रुपयांचा बोनस मिळाला होता, पण द्रविडने यातील निम्मेच म्हणजे केवळ अडीच कोटी रुपये घेतले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अलीकडेच T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
बीसीसीआयने संघाला एकूण १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली होती. यामध्ये कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या खात्यात ५ कोटी तर इतर प्रशिक्षकांना अडीच कोटी रुपये जमा होणार होते.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, द्रविडने बीसीसीआयला त्याची बक्षीस रक्कम ५ कोटींवरून २.५ कोटी रुपये करण्याची विनंती केली कारण त्याला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांपेक्षा जास्त पैसे घ्यायचे नव्हते. सर्व प्रशिक्षकांना समान रक्कम मिळाली पाहिजे, असे राहुल द्रविडचे मत आहे.
“राहुल द्रविडला त्याच्या उर्वरित स्टाफएवढाच बोनस घ्यायचा होता.” यामुळे आम्ही त्याच्या मताचा आदर करतो, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
तसे, राहुल द्रविडने सर्व प्रशिक्षकांमध्ये समान प्रमाणात बोनस वितरित करण्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१८ मध्ये, जेव्हा भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता, तेव्हा राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता. द्रविडला ५० लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफला २० लाख रुपये बोनस म्हणून मिळणार होते.
त्यावेळीही राहुल द्रविडने बोनस स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यावेळीही त्याने सर्व प्रशिक्षकांना समान बोनस देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीसीसीआयने आपला निर्णय बदलला आणि द्रविडसह सर्व प्रशिक्षकांना २५ लाख रुपयांचा बोनस दिला. तर खेळाडूंना बोनस म्हणून ३० लाख रुपये मिळाले.
२०२४ टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडने उचललेल्या पावलाबद्दल क्रिकेट जगतात त्याचे खूप कौतुक होत आहे. त्याच्या खेळाच्या दिवसांप्रमाणे द्रविडने पुन्हा एकदा आपल्या संघाला पुढे ठेवले. त्याच्या या कृतीसाठी माजी मुख्य प्रशिक्षक द्रविडचे खूप कौतुक केले जात आहे.
संबंधित बातम्या