भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
यानंतर, आता पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची निवड कधी होणार, आणि कोण-कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.
दरम्यान, विशाखापट्टणम कसोटीनंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी द्रविडने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यातच द्रविनडे इशान किशनबाबतही वक्तव्य केले.
द्रविडला विकेटकीपर फलंदाज इशान किशनबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. ईशान किशन टीम इंडियात कधी परतणार हा प्रश्न होता.
यावर द्रविडने सडेतोड उत्तर दिले. कोणालाही संघात परतायचे असेल तर त्यांना आधी क्रिकेट खेळावे लागेल, असे द्रविडने स्पष्ट सांगितले.
म्हणजेच ईशानला देशांतर्गत क्रिकेट खेळून आधी स्वत:ला सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच तो टीम इंडियात पुनरागमन करू शकेल, असे राहुल द्रविडने स्पष्टपणे सूचित केले आहे. राहुल द्रविडचे हे उत्तर ईशान किशनसाठी थेट इशाराच असल्याचे बोलले जात आहे.
टीम इंडिया जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती, तेव्हा इशान किशनचाही संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, कसोटी मालिकेपूर्वी इशानने ब्रेक मागितला. टीम मॅनेजमेंटलाही ईशानला ब्रेक द्यायला काहीच हरकत नव्हती, पण राहुल द्रविडने एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे इशानला देशांतर्गत क्रिकेट खेळून टीम इंडियात परत यावं लागेल.
मात्र यानंतर, नेमके उलटे झाले. इशान किशनने ब्रेक घेतला पण रणजी ट्रॉफीमध्ये तो आपल्या घरच्या संघासाठी म्हणजेच झारखंडसाठी खेळताना दिसला नाही.
अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंटनेही ईशानला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान दिले नाही. यानंतर इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही त्याला टीम इंडियात घेण्यात आले नाही. आता पुढील तीन कसोटी सामन्यांमध्येही ईशानला स्थान मिळणार नसल्याचे मानले जात आहे.
ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर इशान किशनला कसोटी सामन्यांमध्ये यष्टिरक्षणासाठी पहिली पसंती होती, मात्र इशानने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर फलंदाजीत निराशाजनक कामगिरी करूनही केएस भरतला टीम इंडियामध्ये संधी मिळत आहे. अशा स्थितीत भारतीय टीम मॅनेजमेंट अजिबात हलगर्जीपणाच्या मनस्थितीत नसल्याचे यावरून सिद्ध होते.