भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका ऑटोच्या चालकाशी वाद घालताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक द्रविड याचा हा व्हिडीओ बेंगळुरूचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
वास्तविक, एका ऑटोची द्रविडच्या कारला थोडीशी टक्कर झाली. यानंतर हा वाद झाला. व्हिडीओमध्ये द्रविड ड्रायव्हरला सांगताना दिसत आहे की, धडकेनंतर त्याच्या कारला डेंट झाला आहे.
द्रविड यावेळी रागात दिसत आहे, पण तो अतिशय सभ्य भाषेत ऑटो चालकाशी वाद घालत आहे. यनंतर चाहत्यांनी द्रविडच्या स्वभावावरून सोशल मीडिया पोस्ट केल्या आहेत. रागाच्या भरातही द्रविड ज्या विनम्रतेने त्या ऑटो चालकाशी बोलत आहे, हे पाहून चाहत्यांना द्रविडचे कौतुक वाटत आहे.
ही घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) घडली आहे. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास द्रविड कुठेतरी जात होता. याच दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार आलेली नाही. बेंगळुरूच्या हाय ग्राउंड्स ट्रॅफिक पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.
या प्रकरणी सांगितले जात आहे की, राहुल द्रविड त्याच्या एसयूव्ही कारमधून जात होता. तो इंडियन एक्सप्रेस सर्कलहून हाय ग्राउंडच्या दिशेने जात होता, तिथे त्याला खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागला. या वाहतुकीदरम्यान अचानक लोडिंग ऑटोने द्रविडच्या कारला मागून धडक दिली.
याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'ही एक छोटीशी घटना होती, ती घटनास्थळी सोडवता आली असती. पण सध्या तरी या प्रकरणी आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, धडकेनंतर द्रविड खूपच निराश दिसत होता आणि तो ड्रायव्हरला कन्नड भाषेत बोलत होता. द्रविडने आपल्या कारच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि ड्रायव्हरला याबद्दल माहिती दिली. तेथून निघताना द्रविडने ऑटोचालकाकडून त्याचा फोन नंबर आणि रजिस्ट्रेशन क्रमांक घेतल्याचेही वृत्त आहे.
संबंधित बातम्या