आयपीएल 2024 दरम्यान, मुंबई इंडियन्समधील अंतर्गत मतभेदाच्या बातम्यांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. जेव्हा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले होते. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्स संघातील वातावरण खराब झाले होते. तसेच, रोहितचे चाहते आणि टीममधील बरेच लोक खूश नसल्याचे समोर आले होते. यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकला मैदानात आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले.
पण आता रोहित आणि हार्दिक यांच्यात सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले जात आहे. एका क्रीडा पत्रकाराने खुलासा केला आहे की, रोहित आणि हार्दिक यांच्यातील संबंध सुधारण्यात राहुल द्रविड आणि विराट कोहली यांचाही मोठा हात होता.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी आपले मतभेद विसरून कसे एकत्र आले आणि देशासाठी टी-20 विश्वचषक जिंकला. भारताच्या पहिल्या सराव सत्रात विमल कुमार अमेरिकेत उपस्थित होते. ते म्हणाले की दोन्ही खेळाडूंनी दीर्घ चर्चेद्वारे कोणतेही मतभेद सोडवले.
टी-20 विश्वचषक २०२४ दरम्यान जेव्हा रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या नेटमध्ये सरावाच्या पहिल्या दिवशी एकमेकांशी बोललेही नव्हते. पण सरावाचा दुसरा दिवस आला तेव्हा रोहित आणि हार्दिक एका कोपऱ्यात एकत्र बसून बोलतांना दिसले. बराच वेळ त्यांचा संवाद चालू होता. त्यानंतर दोघांनी एकत्र सराव केला.
'टू स्लॉगर्स पॉडकास्ट'वर विमल कुमार म्हणाले, जेव्हा मी नेटवर गेलो तेव्हा मी पाहिले की हार्दिक आणि रोहित संवाद साधत नाहीत. पहिल्या दिवशी ते बोलत नव्हते आणि एकमेकांपासून दूर होते, पण दुसऱ्या दिवशी मी पाहिले की ते एक एक करून आले आणि एका कोपऱ्यात एकत्र बसून बराच वेळ बोलत होते. माझ्यासाठी तो क्षण या संघाची व्याख्या ठरला. तेथे कॅमेरे नव्हते; काहीही नाही. रोहित आणि हार्दिक बोलत असताना मला वाटलं, 'मी हे काय पाहतोय?'
ते पुढे म्हणाले, भारतात बरेच काही चालले आहे, लोक त्यांच्या मतभेदांबद्दल बोलत आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवस रोहित आणि हार्दिकने एकत्र फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केला. जेव्हा मी ते वातावरण पाहिले आणि संघाचे वातावरण किती आरामदायक होते हे दिसून आले आणि शेवटी काय झाले ते संपूर्ण जगाने पाहिले".
पॉडकास्टवरील चर्चेत असेही सांगण्यात आले की रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला एकत्र आणण्यात राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीही खूप महत्त्वाची भूमिका बजावली. द्रविडने विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासारख्या प्रसिद्ध खेळाडूंना एकत्र ठेवले. शेवटी संपूर्ण संघ विश्वचषकात एकत्र खेळला.