बेंगळुरू कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा युवा स्टार रचीन रविंद्र याने शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. रवींद्रने १२४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, यादरम्यान त्याने ११ चौकार आणि २े षटकारही मारले. यासह न्यूझीलंडने आपल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. तर न्यूझीलंडची धावसंख्या ३५० च्या पार गेली आहे.
यानंतर रचिन रवींद्र हा भारतीय भूमीवर शतक झळकावणारा न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील २१वा खेळाडू ठरला आहे.
रचिन रवींद्र याने आज (१८ ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी ३४ चेंडूत २२ धावांवरून आपला डाव सुरू केला. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण रवींद्र दुसऱ्या टोकाला ठाम होता. बेंगळुरू कसोटीच्या सुरुवातीच्या सत्रात डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री आणि टॉम ब्लंडेल यांनीही विकेट गमावल्या. दरम्यान, रवींद्रला टीम साउथीची साथ मिळाली. साउथीनेही दमदार अर्धशतक झळकावले.
रचिन रवींद्र हा २०१२ नंतर भारतात कसोटी शतक झळकावणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे. २०१२ मध्ये, रॉस टेलरने ११३ धावांची खेळी खेळली आणि योगायोगाने तो सामनाही बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.
रवींद्रला या मैदानाशी विशेष प्रेम असल्याचे दिसते कारण २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात त्याने चिन्नास्वामी स्टेडियमवरच पाकिस्तानविरुद्ध १०८ धावांची शानदार खेळी खेळली होती.
त्याने २०२१ साली कानपूर येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीतील १९ डावांत २ शतके झळकावली आहेत. त्याचे पहिले शतक या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाले होते, जेव्हा त्याने २४० धावा करताना शानदार द्विशतक झळकावले होते.