टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत अश्विनने १०० वा कसोटी सामना खेळला. सोबतच या मालिकेत अश्विनने ५०० कसोटी बळीही पूर्ण केले.
दरम्यान, ही कसोटी मालिका सुरूअसताना अश्विनला मधातच आपल्या घरी चेन्नईला परतावे लागले होते. त्याच्या आईच्या प्रकृती बिघडल्यामुळे अश्विन राजकोट कसोटीदरम्यान घरी गेला होता.
पण आता अश्विनने त्या घटनेबाबत सविस्तर सांगितले आहे. अश्विनने अलीकडेच त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले, की त्याच्या आईच्या प्रकृतीबाबत ऐकून त्याची काय अवस्था झाली होती. अश्विन त्यावेळी फ्लाइटच्या शोधात होता, पण त्याला चेन्नईला जाण्यासाठी कोणतीच फ्लाइट उपलब्ध नव्हती. पण यानंतर कर्णधार रोहित शर्मा जे केले ते पाहून अश्विन खूपच प्रभावित झाला. रोहित हा धोनीपेक्षा १० पावले पुढे असल्याचे अश्विनने या व्हिडीओत सांगितले आहे.
वास्तविक, अश्विनने तिसऱ्या राजकोट कसोटीत कसोटी कारकिर्दीतील ५०० बळी पूर्ण केले. पण यानंतर त्याला समजले की, त्याच्या आईची प्रकृती बिघडली आहे. हे ऐकून अश्विन रडू लागला आणि घरी जाण्यासाठी फ्लाइट शोधू लागला. पण फ्लाइट उपलब्ध नव्हती.
अश्विनने डॉक्टरांशी संवाद साधताना विचारले की, आई कशी आहे. ती शुद्धीवर आहे का? यावर डॉक्टरांनी सांगितले की, ती सध्या पाहण्याच्या स्थितीत नाही. हे ऐकताच अश्विनच्या डोळ्यात पाणी आले. यानंतर जेव्हा त्याला राजकोट ते चेन्नईला जाणारे विमान मिळू शकले नाही तेव्हा रोहित शर्मा आणि द्रविड त्याच्या खोलीत आले.
'रोहित एक जबरदस्त लीडर'
अश्विन पुढे म्हणाला की, रोहित आणि राहुल भाई माझ्या खोलीत आले. रोहित म्हणाला विचार करू नकोस आणि फॅमिलीजवळ जा. तो माझ्यासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होता.
रोहित या कठीण काळात माझ्या सोबत राहिला. रात्रीचे साडेनऊ वाजले होते तरी तो माझ्यासोबतच होता. तो फ्लाइटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवशी मला रोहित शर्मामध्ये एक जबरदस्त लीडर दिसला.
यासोबतच अश्विन म्हणाला, की धोनी एक महान नेता आहे, ज्या प्रकारे त्याने त्याच्या नेतृत्वाखाली CSK ला IPL मध्ये 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनी मैदानावर शांतपणे घेतलेल्या निर्णयांसाठी ओळखला जातो, पण त्या दिवशी रोहितने जे केले त्यामुळे माझ्या नजरेत तो सर्वापेक्षा १० पावले पुढे गेला आहे.
'रोहितसाठी काहीही करू शकतो'
रोहित ज्या प्रकारचा माणूस आहे, त्यामुळे कोणताही खेळाडू त्याच्यासाठी आपला जीव देण्यासही तयार होईल.
यावेळी अश्विनने बॅझबॉल स्टाइलवर टीका केली. तो म्हणाला की, पहिल्या कसोटीनंतर मला एक गोष्ट समजली की बॅझबॉल केवळ आक्रमक क्रिकेट नाही. ते असुरक्षित क्रिकेटदेखील आहे. इंग्लिश संघाला अजिबात बचावात्मक खेळ करता आली नाही. इंग्लंडच्या आक्रमक खेळण्याच्या रणनीतीशी जो रूट यानेही सहमती दर्शवली याचे मला आश्चर्य वाटले. मला माहीत होते की जर तो आमच्याविरुद्ध आक्रमक खेळला तर तो विकेट गमावेल. आम्ही तेच घडले.'