India vs England 2nd Test Day 2, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला.
यानंतर आता इंग्लंडचा पहिला डाव खेळला जात आहे. दरम्यान या कसोटीत भारताचा अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनकडे काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
अश्विनने या मालिकेतील पहिल्या कसोटीत ६ विकेट घेतल्या होत्या. पण टीम इंडियाचा पराभव झाला होता. आता मालिकेतील दुसरा सामना जिंकायचा असेल तर अश्विनला चांगली कामगिरी करावी लागेल.
आता अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक-दोन नव्हे तर ५ मोठे विक्रम करण्याची सुवर्ण संधी आहे.
१) आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत २० कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण ९३ बळी घेतले आहेत. भारताकडून इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर आहे.
चंद्रशेखर यांनी २३ कसोटी सामन्यात ९५ बळी घेतले आहेत. आता या कसोटीत अश्विनने फक्त ३ विकेट्स घेतल्या तर तो चंद्रशेखर यांना मागे टाकेल.
२) आर अश्विनने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकूण ९६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४९६ विकेट घेतल्या आहेत. जर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त ४ विकेट घेतल्या तर त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स पूर्ण होतील. त्यानंतर कसोटीत ५०० बळी घेणारा तो जगातील ९वा आणि भारताकचा दुसरा गोलंदाज बनेल.
३) भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. दोन्ही देशांदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसनचे नाव आघाडीवर आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात त्याने १३९ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने या सामन्यात आणखी ७ विकेट घेतल्यास त्याच्या एकूण १०० विकेट्स होतील.
४) अश्विनने आतापर्यंत ९६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. जर तो दोन्ही डावांत ५ बळी घेण्यास यशस्वी झाला तर तो अनिल कुंबळेला मागे टाकेल. कुंबळेने कसोटीत भारतासाठी ३५ वेळा ५ बळी घेण्याचा विक्रम केला आहे.
५) भारतीय पीचेसवरील कसोटीत अनिल कुंबळेने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतीय भूमीवर ३५० विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर ५६ कसोटी सामन्यांमध्ये ३४३ विकेट्स आहेत. अश्विनने या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या तर तो कुंबळेला मागे टाकेल.