महान क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन हा भारताने तयार केलेल्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची आकडेवारी याची साक्ष देते. अश्विन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे आणि सध्या तो आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल गोलंदाज आहे.
विशेष म्हणजे, आर अश्विन आज (१७ सप्टेंबर) त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
अश्विनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक महान विक्रम केले आहेत, परंतु त्याच्या आयुष्यात त्याला एक खास विक्रम करायचा आहे. अश्विनने स्वतः खुलासा केला की, त्याचे एक स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. भारताच्या ऑफस्पिनरच्या या स्वप्नाबद्दल जाणून घेऊया.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा स्टार ऑफस्पिनर आर अश्विनने मोठा खुलासा केला आहे.
विमल कुमार यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने सांगितले की, त्याचे एक स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.
अश्विनने सांगितले की, मला एका षटकात ६ षटकार मारायचे होते, पण तसे झाले नाही. यावेळी अश्विन मोठ्याने हसतानाही दिसला.
यावेळी अश्विनने आपल्या निवृत्ती योजनेबद्दलही सांगितले, ज्या दिवशी त्याला वाटेल की गोलंदाजीत आता आपण आणखी सुधारू शकत नाही, त्याच दिवशी तो निवृत्त होईल. अश्विनने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने कसोटीत १०० सामने खेळताना ५१६ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट २.८१ आहे.
हा स्टार भारतीय फिरकी गोलंदाज आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.