R Ashwin News in Marathi : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतानं बरोबरी साधल्यानंतर ३८ वर्षीय अश्विननं ही घोषणा केली. अश्विनच्या नावावर एकूण ५३७ कसोटी बळी आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाचव्या दिवशी पावसामुळं व्यत्यय आला असतानाच्या वेळेत विराट कोहली भावूक होऊन अश्विनला मिठी मारताना कॅमेऱ्यात टिपला गेला होता. तेव्हाच नक्कीच काहीतरी घडत असावं अशी पाल क्रिकेटप्रेमींच्या मनात चुकचुकली. त्यानंतर अश्विन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नॅथन लायनसोबत वेळ घालवताना दिसला. अश्विननं अखेर ती शंका खरी ठरवली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अश्विनच्या निवृत्तीला दुजोरा दिला.
सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन फक्त एक कसोटी खेळला होता. अॅडलेड इथं झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दहा गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात अश्विननं केवळ एक विकेट घेत २२ धावा दिल्या आणि ७ धावांची खेळी केली. अश्विन हा देशातील आजवरच्या महान ऑफ स्पिनर्सपैकी एक आहे. त्यानं भारताकडून १०६ कसोटी, ११६ वनडे आणि ६५ टी-२० सामने खेळले असून सर्व प्रकारात मिळून ७७५ विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत अश्विननं २४ च्या सरासरीनं आणि ५०.७ च्या स्ट्राईक रेटनं विकेट्स घेतल्या आहेत. तसंच, त्याच्या नावावर ५३७ विकेट्स आहेत. अश्विनच्या कामगिरीची यादी एवढ्यावरच संपत नाही. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो जगातील सातवा गोलंदाज आहे आणि सध्या तो कसोटीत ऑफ स्पिनर्समध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मात्र, नॅथन लायन लवकरच त्याचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
अश्विननं २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र, त्याआधीच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनीसोबत खेळताना अश्विन प्रकाशझोतात आला. धोनीनं त्याला हेरलं आणि त्याच्यातील फिरकीच्या कौशल्याला वाव दिला. पॉवरप्लेमध्ये त्याच्याकडं नवीन चेंडू सोपवण्याचा जुगारही धोनी खेळला. मात्र अश्विननं त्याचा विश्वास सार्थ ठरवला.
पॉवरप्लेमध्ये अश्विननं अनेकदा ख्रिस गेलसारख्या फलंदाजांना बाद केलं. आयपीएलमुळं त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दारं खुली झाली आणि त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही. २०११ चा विश्वचषक आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय चमूचाही तो भाग होता.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची कामगिरी खराब नव्हती. मात्र, कसोटी सामन्यांमध्ये अश्विननं आपला ठसा उमटवला. विशेषत: भारतात त्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर अक्षरश: नाचायला भाग पाडलं. डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध त्याचा अभूतपूर्व विक्रम आहे. त्याच्या सर्व कसोटी विकेट्सपैकी ३८३ विकेट्स भारतात २१.५७ च्या सरासरीनं आल्या आहेत. महान खेळाडू असूनही भारत परदेशात खेळत असताना अश्विनला अनेकदा संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं. अश्विननं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २६ कसोटी सामने खेळले आहेत.
गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही आपण कमी नसल्याचं अश्विननं सिद्ध केलं होतं. कसोटीत त्याच्या नावावर सहा शतकं आणि १० अर्धशतकं आहेत. १०६ सामन्यात त्यानं २५.७५ च्या सरासरीनं ३५०३ धावा केल्या आहेत. त्यानं नुकतंच बांगलादेशविरुद्ध शतकही झळकावलं होतं. आंतरराष्ट्रीय मैदान सोडलं असलं तरी आयपीएल २०२५ मध्ये तो मैदानावर दिसणार आहे. तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल.
संबंधित बातम्या