India vs England 2nd Test Day 1, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात ६ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १७९ धावा करून तर रविचंद्रन अश्विन ५ धावांवर नाबाद परतले आहेत, उद्या (३ फेब्रुवारी) दोघेही या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करतील.
यशस्वी जैस्वालने आज आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. पण भारताचे इतर फलंदाज मात्र, इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले.
दरम्यान, आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. आजच्या दिवसाचे शेवटचे षटक रविचंद्रन अश्विनने खेळून काढले. यानंतर दिवस समाप्तीची घोषणा झाली. पण या दरम्यान मैदानावरील पंच मारायस इरास्मस आणि अश्विन यांच्यात कशावरुन तरी जोरदार चर्चा झाली. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अश्विन कोणत्यातरी गोष्टीवरुन नाराज झाल्याचे या चर्चेदरम्यान दिसत होते. इंग्लंडचे खेळाडू बाहेर जात असताना ते पंच इरास्मस यांच्याशी बोलत होते. यानंतर आता मैदानावर नेमकं काय घडलं? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, इंग्लंडच्या खेळाडूंना खेळ आणखी काहीवेळ ठेवायचा सुरू होता. तशी मागणी त्यांनी पंचांकडे केली होती. पण यावरुन अश्विनने पंचांकडे नाराजी व्यक्त केली. पण अश्विन आणि पंच यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची अधिकत माहिती उपलब्ध नाही.
भारत-इंग्लंड कसोटीत आज दिवसभरात ९० पेक्षा जास्त षटकांचा खेळ झाला. यात भारताने ६ बाद ३३६ धावा ठोकल्या. भारताकडून केवळ यशस्वी जैस्वालनेच ५० हून अधिका धावा केल्या.
भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, मात्र ते मोठी खेळी खेळू शकले नाहीत. जैस्वालनंतर शुभमन गिलने ३४ धावा केल्या, ही भारताकडून दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
संबंधित बातम्या