पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज (१४ फेब्रुवारी) ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी बॉम्बरने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात ४० CRPF जवान शहीद झाले होते. हा हल्ल्यानंतर भारताच्या क्रिकेट संघाने शहीद सीआरपीएफ जवानांच्या आदरार्थ एक मोठा निर्णय घेतला होता.
या हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी टीम इंडियाने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेतील एक सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ स्पेशल टोपी परिधान केली होती.
वास्तविक, ही लष्करी टोपी होती आणि तसे करण्यापूर्वी बीसीसीआयने आयसीसीची परवानगीही घेतली होती.
सोबतच टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्या सामन्याची मॅच फी जवानांच्या कुटुंबियांना दिली होती. त्यावेळी टीम इंडियाने नॅशनल डिफेन्स फंडला एक कोटीहून अधिक रुपये दिले होते. टीम इंडियाच्या खेळाडूंना एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ८ लाख रुपये मिळत होते आणि बेंचवर बसलेल्या खेळाडूंना प्रत्येकी ४ लाख रुपये दिले जात होते. अशा परिस्थितीत टीम इंडियाने अंदाजे एक कोटी रुपयांहून अधिकचा निधी दिला होता.
एमएस धोनीने पुढाकार घेतल्यानंतरच टीम इंडियाने या मॅचमध्ये मिलिटरी कॅप घातली होती आणि टॉसच्या आधी धोनीनेच कोहली आणि इतर खेळाडूंना कॅप दिली होती.
दुसरीकडे, नाणेफेकीच्या वेळी विराट कोहली म्हणाला होता, 'ही खास कॅप आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हे आहे. सर्व खेळाडूंनी या स्पेशल गेममधून त्यांची मॅच फी राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचा कर्णधार या नात्याने मी देशातील प्रत्येकाने असेच करावे असे आवाहन करेन.
संबंधित बातम्या