पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा थरार सुरू आहे. याच स्पर्धेतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा पाकिस्तानचा सुपरस्टार बाबर आझम याचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बाबर चांगलाच संतापलेला दिसत आहे.
आता नेहमी शांत असणारा बाबर आझम कशामुळे चिडला आहे, याचे कारण आपण येथे जाणून घेणार आहोत.
वास्तविक, PSL सामन्यादरम्यान काही चाहत्यांना बाबरला प्रचंड ट्रोल केले. यामुळे बाबरच संयम सुटला आणि त्याने प्रेक्षकांना पाण्याची बॉटल फेकून मारण्यााच इशाराही केला. बाबरचा असा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझम हा टेक्निकल टीमसह सीमारेषेवर बसलेला होता. त्यावेळी सामना पाहण्यास आलेल्या काही चाहत्यांनी बाबरला पाहून झिम बाबर, झिम बाबर अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. सतत या घोषणा ऐकून बाबर चांगलाच खवळला. यानंतर त्याने चाहत्यांकडे पाहत काहीतरी म्हटले आणि पाण्याची बॉटल फेकून मारण्यााच इशारा केला.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये आपल्याच देशवासियांनी केलेल्या ट्रोलिंगमुळे बाबर चांगलाच संतापलेला दिसत होता. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाबर आझमने २०१५ साली पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो आता पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज आहे. पण गेल्या काही काळापासून बाबर अतिशय वाईट फॉर्मात आहे. तसेच, तो भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध धावा करण्यात सतत अपयशी ठरतो. पण दुबळ्या संघांविरुद्ध बाबरची बॅट चांगलीच बोलते. त्यामुळे सोशल मीडियावरील चाहत्यांनी ट्रोलिंगच्या उद्देशानने त्याला झिम बाबर असे नाव दिले आहे.
तसेच, सोशल मीडियावर अनेक चाहते असेही म्हणतात, की जेव्हा बाबर खराब फॉर्मात असतो तेव्हा पाकिस्तानची एखादी सीरीज झिम्बाब्वेविरुद्ध ठेवली पाहिजे. कारण झिम्बाब्वेविरुद्ध बाबरची कामगिरी नेहमी चांगली होते.
बाबर आझमने झिम्बाब्वेविरुद्ध आतापर्यंत १८ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ५७.७५ च्या सरासरीने ६९३ धावा केल्या आहेत. यामुळे चाहत्यांनी झिम बाबरच्या घोषणा दिल्या.