भारताचा युवा आणि प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ ९ नोव्हेंबर रोजी २५ वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या आणि क्रिकेट समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान, पृथ्वी शॉला एक आनंदाची बातमी मिळाली, ती म्हणजे, आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईच्या २५ सदस्यीय संभाव्य संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
पण या दरम्यान, त्याच्या २५ व्या वाढदिवशी, शॉने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो सध्या वादात सापडला आहे. पृथ्वी शॉने मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये शॉ जबरदस्त डान्स करत दिसत आहे. हा डान्स पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
त्याच्या फिटनेस आणि शिस्तीकडे लक्ष न दिल्याबद्दल चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली, ज्यामुळे त्याला आधी मुंबईच्या संघातून वगळण्यात आले होते. पृथ्वी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळेच तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकला नाही.
फिटनेस आणि शिस्तीच्या मुद्द्यांमुळे त्याला मुंबईच्या रणजी संघातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या संघात समावेश होणार आहे. या घोषणेमुळे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या युवा फलंदाजाच्या T20 क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र, शॉची क्रिकेट कारकीर्द मैदानाबाहेरील वादांनी अधिक चर्चेत राहिली आहे.
२५ वर्षीय पृथ्वी शॉ भारताकडून आतापर्यंत तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने ५ कसोटी, ६ एकदिवसीय आणि एकमेव T20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या कसोटीत ३३९ धावा, एकदिवसीय सामन्यात १८९ धावा आहेत आणि T20 मध्ये त्याला आतापर्यंत एकही धाव करता आलेली नाही.
याशिवाय शॉ २०१८ पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र, मेगा लिलावापूर्वी त्याला सोडण्यात आले आहे. शॉने आयपीएलमध्ये ७९ सामन्यांमध्ये १८९२ धावा केल्या आहेत.