Prithvi Shaw Playing 11, IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७ व्या मोसमातील १३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे राहिला नाही, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचा पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने तर त दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभवाचा धक्का दिला.
त्याचवेळी, आतापर्यंत झालेल्या या दोन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही, यामुळे चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी कधी मिळणार, याबाबत सांगितले आहे.
पृथ्वी शॉचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना रिकी पॉंटिंग म्हणाला की, शॉने गेल्या काही आठवड्यात खूप मेहनत केली आहे. पहिल्या सामन्यात आम्ही एनरिक नॉर्खियाशिवाय खेळलो, ज्यामध्ये आम्हाला ४ परदेशी फलंदाजांना खेळवण्याची संधी मिळाली. यामुळे आम्ही डेव्हिड वॉर्नरसह मिचेल मार्शला सलामीला खेळण्याची जबाबदारी दिली आणि त्यामुळे आम्हाला शॉला आकरामधून बाहेर ठेवावे लागले.
शॉ सध्या नेटमध्ये घाम गाळत आहे आणि आम्ही त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहोत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी जर त्याने आम्हाला प्रभावित केले तर आम्ही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा नक्कीच विचार करू.
दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंतचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाल्यानंतर संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना वाटत होती. मात्र आतापर्यंत दिल्ली संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉइंट टेबलमध्ये ९व्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट -०.५२८ आहे.