Vijay Hazare Trophy 2024-25 : युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात तो अनसोल्ड राहिला. यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याची कामगिरी विशेष नव्हती.
आता १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची निवडच करण्यात आलेली नाही.
मुंबईने विजय हजारे ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर (Vijay Hazare Trophy Mumbai Squad) केला आहे. पण जाहीर झालेल्या संघात पृथ्वी शॉचे नाव गायब आहे. म्हणजेच, आता मुंबई संघातूनही त्याला वगळण्यात आले आहे.
या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर पृथ्वीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली निराशा व्यक्त केली आहे.
२५ वर्षीय पृथ्वीला यावेळी साईबाबांची आठवण झाली. पृथ्वी शॉने इंस्टाग्राम स्टोरीवर लिस्ट अ क्रिकेटचा त्याचा रेकॉर्ड शेअर केला आणि लिहिले,
‘देवा मला सांग मला आणखी काय करावे लागणार आहे? ६५ डावात ५५.७ च्या सरासरीने आणि १२६ च्या ३३९९ धावा पुरेशा नाहीत का? मी काय करू? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आशा आहे की लोकांचाही माझ्यावर अजूनही विश्वास असेल. कारण मी नक्कीच पुनरागमन करेन. ओम साई राम’.
मुंबईने नुकतीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघात पृथ्वी शॉ देखील होता. शॉने स्पर्धेत आपल्या प्रतिभेची चमक दाखवली आणि ९ सामन्यांमध्ये १९७ धावा केल्या. पण त्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हते.
फायनलमध्ये मध्य प्रदेशचा ५ गडी राखून पराभव केल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता, 'मला वाटते की तो नैसर्गिकरित्या प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्याकडे इतकं टॅलेंट आहे जे इतर कुणाकडे नाही. त्याला फक्त शिस्ती पाळावी लागेल. असे केल्याने तो मोठी उंची गाठू शकतो.
विजय हजारे ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्यासाठी मुंबईचा १९ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, रॉयस्टन डायस, जुनैद खान, हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.
संबंधित बातम्या