Prithvi Shaw hundred vs Chhattisgarh : मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने शतकी खेळी केली आहे. त्याने आज (९ फेब्रुवारी) रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगडविरुद्ध १८५ चेंडूत १५९ धावांची शानदार खेळी केली. या शतकाच्या जोरावर त्याने टीम इंडियात मिळण्याचा दावा ठोकला आहे.
पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. या काळात त्याने एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर काम केले आणि आता रणजी ट्रॉफीमध्ये शतक साजरे केले.
पृथ्वी शॉच्या खेळीत १८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. इतकेच नाही तर भूपेनसह पृथ्वी शॉनेही मुंबईला पहिल्या विकेटसाठी २४४ धावांची सुरुवात करून दिली. या खेळीद्वारे पृथ्वी शॉ फॉर्म आणि फिटनेस दोन्ही सिद्ध करण्यात यशस्वी ठरला आहे.
पृथ्वी शॉचे फॉर्ममध्ये परतणे ही दिल्ली कॅपिटल्ससाठीही दिलासादायक बातमी आहे. गेल्या मोसमात पृथ्वीने अत्यंत खराब कामगिरी केली होती. पण तरी दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला संघासह कायम ठेवले.
ऋषभ पंत अद्याप संपूर्ण हंगामात खेळण्याची खात्री नाही. त्यामुळे पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्ससाठी गेम चेंजर ठरू शकतो.
पृथ्वी शॉने वयाच्या १९व्या वर्षी टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करताना शतक झळकावले होते. यानंतर भविष्यातील स्टार म्हणून शॉकडे पाहिले जात होते. पण त्यानंतर पृथ्वी शॉचा फॉर्म आणि फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
टीम इंडिया आता भविष्याकडे पाहत आहे. अशा परिस्थितीत शॉकडे स्वत:ला सिद्ध करण्याची आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची उत्तम संधी आहे. पृथ्वी शॉने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२१ मध्ये खेळला होता.
पृथ्वी शॉने भारतासाठी ५ कसोटी सामन्यांसह ६ वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे.