भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) संताप व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये नियम हे सर्वांसाठी समान असले पाहिजेत, जे सध्या दिसत नाहीत, असे त्याने म्हटले आहे.
वास्तविक, बीसीसीआयने नुकतीच खेळाडूंच्या केंद्रीय कराराची यादी जाहीर केली. BCCI ने आपल्या केंद्रीय करारातून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना वगळले आहे. यावरून प्रविण कुमारने बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, BCCI ने ही यादी जाहीर करताना खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले आहे. सोबतच देशांतर्गत क्रिकेट खेळल्यावरच आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास परवानगी मिळेल, असे सांगितले होते.
पण हार्दिक पांड्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. कारण तो फिट असूनही देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला नाही. यावरून प्रविण कुमारने BCCI ला प्रश्न विचारले आहेत. श्रेयस आणि ईशानला केंद्रिय करारातून काढून टाकण्यात आले तर हार्दिकला बीसीसीआयचा ग्रेड ए करार मिळाला आहे.
याबाबत एका युट्यूब चॅनेलवर बोलताना प्रवीण कुमारने हार्दिक आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली. तो म्हणाला, "हार्दिक पांड्या चंद्रावरून खाली आला आहे का? त्याने देशांतर्गत क्रिकेटही खेळले पाहिजे. प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम का आहेत. बीसीसीआयनेही हार्दिकला ताकीद दिली पाहिजे. तुम्ही फक्त देशांतर्गत टी-20 स्पर्धा का खेळल्या पाहिजेत?
तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळल्या पाहिजेत. किंवा तुम्ही काय देशासाठी ६० ते ७० कसोटी सामने खेळला आहात की फक्त टी-20 खेळाल? देशाला तुमची गरज आहे.
प्रवीण कुमार पुढे म्हणाला, "तुम्ही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही, हे लिखित स्वरूपात द्या. तुम्ही तेही करत नाही. याबाबत बीसीसीआयलाही प्रश्न विचारले जावेत. तुम्हाला वाटेल तसे नियमांना वाकवता येणार नाही.'
"जर त्यांना वाटत असेल की हार्दिक हा टी-२० मधील महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या फिटनेसवर परिणाम होऊ नये. तसे असेल तर ते ठीक आहे. अशा परिस्थितीत खेळाडूला सांगितले पाहिजे की तुमची निवड कसोटीत होणार नाही. फक्त टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तुमचा विचार होईल, अशा परिस्थितीत खेळाडू आपल्या भविष्याबद्दल जाणून समाधानी असेल.'
संबंधित बातम्या