श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा आज (२८ सप्टेंबर) तिसरा दिवस आहे. दिवसाच्या पहिल्याच सत्रात श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या याने न्यूझीलंडला गारद केले. न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाने प्रभात जयसूर्यासमोर शरणागती पत्करली. न्यूझीलंडचा पहिल्या डावात अवघ्या ८८ धावांत गारद झाला.
प्रभात जयसूर्याने २.३० च्या इकॉनॉमीसह १८ षटकात ४२ धावा देत ६ बळी घेतले. त्याने डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स आणि कर्णधार टिम साऊदी यांना आपले बळी बनवले. त्याच्याशिवाय निशान पेरीसने ३ आणि असिथा फर्नांडोने १ बळी घेतला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ६०२ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. कामिंदू मेंडिस १८२ धावांवर नाबाद राहिला आणि कुसल मेंडिस १०६ धावांवर नाबाद राहिला.
दिनेश चंडिमलने २०८ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या. अँजेलो मॅथ्यूजने ८८ आणि दिमुथ करुणारत्नेने ४६ धावा केल्या. कर्णधार धनंजय डी सिल्वाने ८० चेंडूत ४४ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्याच्याशिवाय डॅरिल मिशेलने १३ धावा, रचिन रवींद्रने १० धावा, डेव्हन कॉनवेने ९ धावा, एजाज पटेलने ८ धावा आणि केन विल्यमसनने ७ धावा केल्या. टॉम लॅथम आणि कर्णधार टीम साऊदीने २-२ धावा केल्या. विल्यम ओ'रुरकी २ धावा करून नाबाद राहिला.