क्रिकेट हा नेहमीच भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. या खेळाबाबत भारतीयांमध्ये एक वेगळीच आवड पाहायला मिळत आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला कसोटी सामना १९३२ मध्येच खेळला.
अनेकदा भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना या खेळाशी संबंधित आकडेवारी जाणून घेण्यात खूप रस असतो. अशा स्थितीत, कसोटीत द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? हेही तुम्हाला माहिती असले पाहिजे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण अचानक कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणाऱ्या भारती खेळाडूविषयी का बोलत आहोत.
याचे कारण म्हणजे, हा पराक्रम आजच्याच दिवशी घडला होता. होय, २० नोव्हेंबर या दिवशीच एका भारतीय फलंदजाने कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय हा सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर नव्हता, तर तो या दोन महान व्यक्तींच्या काळापूर्वीचा होता.
सुमारे ८० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला पॉली उमरीगर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते. त्यावेळी या फॉरमॅटमध्ये द्विशतक करणारा ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले. त्यांच्यापूर्वी कोणत्याही भारतीयाला ही कामगिरी करता आली नाही.
भारतीय क्रिकेट संघाने २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला आणि कसोटी क्रिकेट खेळणारा भारत हा सहावा देश बनला. आज जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे वर्चस्व असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला पहिले द्विशतक झळकावायला तब्बल २३ वर्षांचा कालावधी लागला.
देशासाठी पहिले द्विशतक झळकावण्याचे श्रेय पॉली उमरीगर यांना आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या आधी सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या बॅटने अनेक विक्रम रचले, परंतु त्यांच्या आधी बहुतेक विक्रम पॉली उमरीगर यांच्या नावावर होते. त्यांनी भारतासाठी पहिल्यांदा द्विशतक झळकावले. २० नोव्हेंबर १९५५ रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी द्विशतक करण्याची कामगिरी केली होती.