टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतली आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाने २९ जून रोजी वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता, पण त्यानंतर लगेच टीम भारतात पोहोचू शकली नाही. बार्बाडोस येथील चक्रीवादळामुळे टीम इंडिया ५ दिवसांनी भारतात परतली.
यानंतर भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसहून थेट दिल्लीला पोहोचला. चाहत्यांसोबत सेलिब्रेशन करण्यापूर्वी रोहित शर्माच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून खेळाडूंना निमंत्रण आले होते. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान झाले.
तेव्हापासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नव्हती. T20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
टीम इंडियाची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सुमारे तासभर भेट झाली. पंतप्रधान स्वतः मध्ये बसले होते. त्यांच्या शेजारी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड होते. बाकीची टीम वर्तुळाकारात बसली होती. पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधानांनी रोहित शर्माला बार्बाडोसच्या पीचवरील मातीच्या चवीबद्दल विचारले. T20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीवर जाऊन माती चाखली होती. हा धागा पकडत त्यांनी रोहितला मजेशीर अंदाजात प्रश्न केला. या प्रश्नावर रोहितने स्मित हास्य केले.
यानंतर पीएम मोदी यांनी जसप्रीत बुमराहला विचारले, शेवटच्या षटकांमध्ये तुझ्या मनात काय चालले होते? बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १८ वे षटक टाकले होते. या षटकात २ धावा झाल्या आणि १ विकेट गेली.
यानंतर पीएम यांनी सूर्याला विचारले, त्या गेम टर्निंग कॅच दरम्यान तू काय विचार करत होतास? दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेतला. या झेलमुळे भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित झाला होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. दक्षिण आफ्रिकेला सामन्याच्या शेवटच्या ३० चेंडूत ३० धावांची गरज होती. त्यांच्या ६ विकेट्स शिल्लक होत्या. येथून टीम इंडियाने पुनरागमन करत विजेतेपदाचा सामना जिंकला. भारताच्या १७६ धावांना प्रत्युत्तर देताना एडन मार्करामचा संघ केवळ १६९ धावा करू शकला.