मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL आधी रणजीला महत्व द्या, ईशानसह पंड्या-चहर यांना BCCI ने दिला दम; बनवला हा नियम

IPL आधी रणजीला महत्व द्या, ईशानसह पंड्या-चहर यांना BCCI ने दिला दम; बनवला हा नियम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 13, 2024 11:19 AM IST

बीसीसीआयने टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूंसाठी रणजी क्रिकेट अनिवार्य केले आहे. जे खेळाडू रणजीकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्यासाठी हा एक कडक संदेश मानला जात आहे

ishan kishan deepak chahar
ishan kishan deepak chahar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना कडक संदेश दिला आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी वेळ वाया घालवणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना रणजी क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत आता हे खेळाडू रणजी ट्रॉफीच्या पुढील सामन्यात खेळताना दिसणार आहेत. अलीकडे टीम इंडिया खेळून आलेल्या अनेक खेळाडूंनी एक प्रकारे रणजी क्रिकेटवर बहिष्कार टाकला होता.

पण बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने आता याबाबत कडकपणा दाखवला आहे. सोमवारी ईमेलद्वारे अनेक खेळाडूंना रणजी खेळण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

पुढील रणजी सामने खेळावे लागणार

रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या या खेळाडूंना १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या आगामी फेरीसाठी आपापल्या राज्यांच्या संघात तात्काळ सामील होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'खेळाडू केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएललाच प्राधान्य देऊ शकत नाहीत, त्यांना देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवावे लागेल आणि त्यांच्या संबंधित राज्य संघांसोबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करावा लागेल.

श्रेयस अय्यरलाही कडक इशारा

आयपीएलच्या तयारीसाठी स्पर्धात्मक क्रिकेट सोडणाऱ्या ईशान किशनसारख्या खेळाडूंवर या नियमाचा परिणाम होईल. ईशान रणजी सोडून बडोद्यात आयपीएलची तयारी करत होता.

दरम्यान, हा निर्णय केवळ इशानबाबत नाही. त्याची व्याप्ती क्रुणाल पांड्या आणि दीपक चहर यांसारख्या इतर खेळाडूंपर्यंत आहे, जे रणजी ट्रॉफी सामन्यांना कमी महत्व देत राहिले आहेत. श्रेयस अय्यरलाही हा इशारा मानला जात आहे.

ईशान किशनने सर्व फॉरमॅटमध्ये सामने खेळले

ईशान किशन हा काही काळापूर्वी टीम इंडियाचा सर्व फॉर्मेट खेळणारा खेळाडू होता. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये (२ कसोटी, २७ एकदिवसीय, ३२ T20I) सामने खेळले आहेत. ज्यात त्याने अनुक्रमे ७८, ९३३ धावा, ७९६ धावा केल्या आहेत.  

ईशान किशनने शेवटचा एकदिवसीय सामना विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत खेळला होता. तर शेवटचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुवाहाटीमध्ये खेळला होता.

WhatsApp channel