PBKS Vs GT IPL 2024 highlights : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (GT) इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये (IPL 2024) चौथा विजय नोंदवला आहे. मुल्लानपूर येथील स्टेडियमवर रविवारी (२१ एप्रिल) झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाब किंग्जचा (pbks) ३ गडी राखून पराभव केला.
हा सामना जिंकून गुजरात संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. हा संघ आता आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरातचे आता ८ गुण झाले आहेत. दुसरीकडे पंजाब संघाचा ८ सामन्यांतील हा सहावा पराभव आहे. हा संघ आता ९व्या क्रमांकावर कायम आहे.
या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना १४३ धावांचे लक्ष्य दिले होते, त्याच्या प्रत्युत्तरात गुजरात संघाने ७ गडी गमावून १४६ धावा करून सामना जिंकला.
१४३ धावांचा पाठलाग करताना गुजरातने एकवेळ १६ व्या षटकात १०३ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर राहुल तेवतियाने १८ चेंडूत नाबाद ३६ धावा करत संघाला विजयाकडे नेले.
तेवतियाशिवाय गुजराकडून शुभमन गिलने २५आणि साई सुदर्शनने ३१ धावा केल्या. तर पंजाब संघाकडून हर्षल पटेलने ३ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २ बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५.३ षटकांत ५२ धावा जोडल्या होत्या.
मात्र, यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि केवळ ९९ धावांवर ७ फलंदाज बाद झाले. यानंतर हरप्रीत ब्रारने अवघ्या १२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या आणि धावसंख्या १४० च्या पुढे नेली. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर गुजरातकडून रवी साई किशोरने सर्वाधिक ४ बळी घेतले.