Pathum Nissanka : पाथूम निसांकाचं वनडेत वादळी द्विशतक, रोहित शर्मा-सेहवागला या बाबतीत मागे टाकलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pathum Nissanka : पाथूम निसांकाचं वनडेत वादळी द्विशतक, रोहित शर्मा-सेहवागला या बाबतीत मागे टाकलं

Pathum Nissanka : पाथूम निसांकाचं वनडेत वादळी द्विशतक, रोहित शर्मा-सेहवागला या बाबतीत मागे टाकलं

Feb 09, 2024 08:30 PM IST

pathum nissanka double century : पाथूम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

pathum nissanka double century
pathum nissanka double century (AFP)

श्रीलंकेचा युवा स्टार पथुम निसांकाने इतिहास रचला आहे. निसांकाने आज शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद २१० धावांची खेळी केली. निसांकाने १३९ चेंडूंच्या खेळीत २० चौकार आणि ८ षटकार मारले.

यानंतर पाथूम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी श्रीलंकेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने २००० मध्ये शारजाच्या मैदानावर भारताविरुद्ध १८९ धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच निसांकाने जयसूर्याचा २४ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे.

या द्विशतकानंतर २५ वर्षांचा पथुम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील दहावा फलंदाज ठरला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन आणि शुभमन गिल यांनी वनडेत द्विशतकं केली आहेत.

तर विदेशी फलंदाजांमध्ये निसांका व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), फखर जमान (पाकिस्तान), मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) यांनीवनडेत द्विशतकं केली आहेत.

निसांकाने आज रोहित-सेहवागला मागे टाकलं

पथुम निसांकाने केवळ १३६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याच्या बाबतीत निसांका तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल सारखे दिग्गज देखील या बाबतीत निसांकापेक्षा मागे आहेत. म्हणजेच, निसांकाने या दिग्गजांपेक्षा कमी चेंडूत द्विशतक पूर्ण केले आहे.

सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे. इशान किशने २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. यानंतर ग्लेन मॅक्सवेल मॅक्सवेल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध १२८ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या