भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीचा आज (३० डिसेंबर) पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र पॅट कमिन्सने एका षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले.
भारताने १६ षटकात बिनबाद २५ धावा करून सावध सुरुवात केली होती, पण १७ व्या षटकात पॅट कमिन्सने टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. कमिन्सने आधी भारतीय कर्णधार रोहित शर्माची शिकार केली आणि नंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
रोहित शर्माच्या विकेटसह पॅट कमिन्स याने एक विश्वविक्रम रचला आहे. कर्णधार विरुद्ध कर्णधार या लढतीत कमिन्सने बाजी मारली आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद केले आहे.
होय, MCG कसोटी पूर्वी पॅट कमिन्सने रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये ४ वेळा बाद केले होते. आता या सामन्याच्या दोन्ही डावात कमिन्सने रोहितची विकेट घेतली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला कसोटीत ६ वेळा बाद करून पॅट कमिन्सने विक्रम केला आहे. कर्णधार विरुद्ध कर्णधाराच्या लढतीत नंबर वन गोलंदाज बनला आहे.
याआधी कॅप्टन विरुद्ध कॅप्टन या लढतीत रिची बेनॉड याने टेड डेक्सटर याला ५ वेळा आणि इम्रान खान यने सुनील गावस्करांन प्रत्येकी ५ वेळा बाद केले होते.
* पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा ६ वेळा बाद
* रिची बेनॉड यांच्या गोलंदाजीवर टेड डेक्सटर ५ वेळा बाद
* इम्रान खान यांच्या गोलंदाजीवर सुनील गावस्करला ५ वेळा बाद
* रिची बेनॉड यांच्या गोलंदाजीवर गुलाबराय रामचंद ४ वेळा बाद
* कपिल देवयांच्या गोलंदाजीवर क्लाइव्ह लॉयड ४ वेळा बाद
दरम्यान, या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावानंतर १०५ धावांची आघाडी घेतली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या बळावर ४७४ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात नितीश रेड्डीच्या शतकाच्या जोरावर भारताने ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २३४ धावा केल्या आणि भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य ठेवले.
संबंधित बातम्या