बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ या वर्षीच्या शेवटी सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही ऐतिहासिक कसोटी मालिका २२ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होईल, तर मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारी २०२५ पासून खेळला जाईल.
दरम्यान, या मालिकेच्या तीन महिन्यांपूर्वीपासूनच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शाब्दिक जंग सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याच्यापासून ते स्टार स्पिनर नॅथन लायनपर्यंत अनेक खेळाडूंनी या मालिकेपूर्वी टीम इंडियाला इशारा दिला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार खूपच उत्साहित दिसत आहे. कांगारूंचा कर्णधार म्हणाला, "ही अशी ट्रॉफी आहे जी मी यापूर्वी जिंकलेली नाही. ही अशी ट्रॉफी आहे जी संघातील बहुतांश खेळाडूंनी जिंकलेली नाही. यावेळी आम्ही निश्चित यशस्वी होऊ"
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायनही भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप उत्सुक आहे. लायन म्हणाला की, १० वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. आम्ही २०१४-१५ साली शेवटची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने चारही मालिका जिंकल्या आहेत. पण यंदा आम्ही कोणत्याही किंमतीत भारताला हरवण्याचा प्रयत्न करू."
कमिन्स दोन महिन्यांच्या विश्रांतीवर
कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी सुमारे ८ आठवड्यांचा दीर्घ ब्रेक घेतला आहे. कमिन्सने स्वत: त्याच्या ब्रेकबद्दल सांगितले होते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वीच्या काही मालिकांमध्ये कमिन्स ऑस्ट्रेलियाचा भाग असणार नाही.
कमिन्सचा ब्रेक घेण्याचा उद्देश फ्रेश होण्याचा आहे. कमिन्स म्हणाला होता, की तो १८ महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्याला आता ब्रेक घ्यायचा आहे. जेणेकरून तो वर्षाच्या शेवटी फ्रेश माइंडने मैदानात परतेल.
पहिली कसोटी – २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर – पर्थ
दुसरी कसोटी – ०६ डिसेंबर ते १० डिसेंबर – ॲडलेड
तिसरी कसोटी – १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर – ब्रिस्बेन
चौथी कसोटी – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्न
पाचवी कसोटी- ०३ जानेवारी ते ७ जाने वारी- सिडनी.