पॅरिसमध्ये सध्या पॅरालिम्पिक गेम्सचा थरार सुरू आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. अशातच आता या खेळांच्या दरम्यान पॅरिसमध्ये टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीच्या नावाची चर्चा सुरू आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये किंग कोहलीचे नावाचा जयघोष होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल.
वास्तविक भारतीय बॅडमिंटन स्टार नितेश कुमार हा विराट कोहलीला आपला हिरो मानतो. नितेशने सुवर्णपदकाचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याच्याविरुद्ध खेळला. या सामन्यादरम्यान समालोचकाने सांगितले की, भारतातील बहुतेक लोक विराट कोहलीकडे स्पोर्टिंग हिरो म्हणून पाहतात.
यानंतर कॉमेंटेटर पुढे म्हणतात की, “तोही (नितेश कुमार) विराट कोहलीला त्याचा हिरो मानतो. एक तेजस्वी भारतीय क्रिकेटर, ज्याने यापूर्वी संघाचे नेतृत्वही केले होते. मला वाटते की भारतातील बहुतेक लोकांचा हिरो हा विराट कोहलीच आहे.”
नितेश कुमार याने बॅडमिंटनच्या पुरुष एकल SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात नितीशने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव केला.
हा सामना खूपच चुरशीचा झाला. नितेशने पहिल्या फेरीत विजय मिळवला. त्यानंतर तो दुसऱ्या फेरीत हरला, त्यानंतर तिसरी फेरी खेळली गेली. नितेशने तिसरी फेरी जिंकून सुवर्णपदक पटकावले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत ५ दिवसांत भारतीय खेळाडूंकडून शानदार कामगिरी पाहायला मिळत आहे. ५ दिवस पूर्ण होत असताना भारताच्या खात्यात एकूण १५ पदके जमा झाली होती. पदकतालिकेत भारत १५व्या स्थानावर आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. यावेळी १९ पदकांचा आकडा पार होणार हे जवळपास निश्चित झालेले दिसत आहे.