दोन्ही हात नसताना कोणी क्रिकेट खेळू शकतो का? किंवा हातांशिवाय क्रिकेट खेळण्याचा कोणी विचारही करू शकतो का? याचे उत्तर नाही असेच असेल. पण असे म्हणतात की, मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है.' आता या ओळी जम्मू काश्मीरच्या एका क्रिकेटपटूने खऱ्या करून दाखवल्या आहेत.
आमिर हुसेन असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. दोन्ही हात नसतानाही क्रिकेट खेळता येते, फक्त हिंमत आणि इच्छा असावी लागते, हे आमिर हुसेन याने दाखवून दिले आहे.
जम्मू काश्मीरचा हा खेळाडू फलंदाजीसोबतच गोलंदाजीही करतो. वयाच्या ८व्या वर्षी दोन्ही हात गमावल्यानंतरही आमिरने हार मानली नाही. आज तो जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.
८ वर्षांचा असताना आमिर हुसैनचा एका मिलमध्ये काम करताना अपघात झाला होता. या अपघातात त्याला आपले दोन्ही हात गमवावे लागले. यानंतर, त्याने बरे होण्यासाठी तीन वर्षे रुग्णालयात संघर्ष केला.
अपघातानंतर लोकांनी त्याच्या वडिलांना सांगितले की, आमिर त्यांच्यावर ओझे होईल. पण आमिरने लढायचे ठरवले. त्याच्या शिक्षकांनी त्याच्यातील क्रिकेट टॅलेंट शोधून काढले आणि त्याला पॅरा क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले. आमिर २०१३ पासून व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे.
सध्या ३४ वर्षांचा असलेला दिव्यांग क्रिकेटर आमिर हुसैन लोन हा बिजबेहारा येथील वाघमा गावचा रहिवासी आहे. पायाच्या बोटांमध्ये चेंडू अडकून तो गोलंदाजी करतो. फलंदाजी करताना तो खांदा आणि मानेमध्ये बॅट धरतो.
त्याचा फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो सहज फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने आमिर हुसैनचा बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सॅम बहादूरच्या प्रमोशनदरम्यान एका टीव्ही शोमध्ये विकीने आमिरशी भेट घेतली होती.
तेव्हा तो म्हणाला होता, ‘आमिरने आज माझी सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. कारण आजकाल मुलाखती दरम्यान बरेच लोक मला विचारतात, की मला कधी कोणत्याही भारतीय क्रिकेटरचा बायोपिक करण्याची संधी मिळाली तर कोणत्या क्रिकेटरचा बायोपिक करशील? आज मला माझे उत्तर मिळाले आहे’.