पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो क्रिकेट चाहत्यासोबत भर रस्त्यात भांडण करत असल्याचे दिसत आहे.
वास्तविक, सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक २०२४ मधून पाकिस्तान क्रिकेट संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघाने निराशाजनक कामगिरी केली, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर सातत्याने टीका होत आहे. पाकिस्तानी क्रीडाप्रेमी आणि समर्थक त्यांच्या संघावर प्रचंड नाराज आहेत.
अशातच आता हारिस रौफचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या हारिस रौफ संतापून एका व्यक्तीशी भांडताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे, की हारिस रौफ आपल्या पत्नीसोबत कुठेतरी जाताना दिसत आहे.
या दरम्यान, हारिसला पाहून एका व्यक्तीने काहीतरी टिप्पणी केली. यानंतर हारिसचा त्या व्यक्तीशी वाद झाला. तो रागाने त्या व्यक्तीच्या अंगावर धावला, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बायको त्याला थांबवण्या प्रयत्न करते, पण तो थांबत नाही. तेथे उपस्थित असलेले इतर काही लोक हारिस रौफला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि संभाव्य हाणामारी टाळतात.
पण या व्हिडीओत हारिस रौफ हा 'तू अपने बाप को गाली देता है... तू अपने बाप को गाली देता है', असे म्हणाताना ऐकायला येत आहे.
पाकिस्तानी संघ २०२४ च्या टी-20 विश्वचषकातील सुपर-८ मध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्यांना अमेरिका आणि भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दोन पराभवांनंतर, त्यांना सुपर-८ गाठणे कठीण झाले आणि नंतर अमेरिकेने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि भारतासह ग्रुप-ए मधून टॉप-८ मध्ये प्रवेश केला.
पाकिस्तानी टीम बाहेर पडल्यानंतर त्यांचे चाहते क्रिकेटपटू आणि बोर्डावर नाराज आहेत. हेच कारण आहे की जिथे जिथे त्यांचे खेळाडू दिसतात तिथे चाहते आपला राग व्यक्त करत आहेत.