टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने अतिशय वाईट कामगिरी केली आहे. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. यानंतर पाकिस्तान संघाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. मग तो खराब खेळाचा विषय असो किंवा खेळाडूंच्या फिटनेसचा.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. या खराब कामगिरीदरम्यान पाकिस्तानचा यष्टीरक्षक आझम खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पाकिस्तानी चाहत्यांचा पारा चांगलाच चढला आहे.
आझम खान फलंदाजीत आणि विकेटकिपींग या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला. शिवाय त्याच्या फिटनेसबाबत आधीच प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आझम भारताच्या पराभवानंतर न्यूयॉर्कमधील स्ट्रीट फूड स्टॉलवर आनंदाने बर्गर खाताना दिसत आहे.
मात्र हा व्हिडिओ नेमका सामन्यानंतरचा आहे की आधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र चाहत्यांचा राग आणि संताप शिगेला पोहोचला आहे.
संघ हरत आहे आणि हा खेळाडू आरामात बर्गर खात आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. आझमने अमेरिकेविरुद्ध एकही धाव केली नाही, त्यानंतर त्याला भारताविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले होते.
टी 20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिका खेळली. इंग्लंडने ही मालिका जिंकली होती. या मालिकेसाठी आझम खानची निवड करण्यात आली होती, मात्र त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्याला ना फलंदाजीत काही करता आले विकेटकीपिंगमध्ये.
अनेकवेळा त्याने विकेट कीपिंग करताना झेलही सोडले, यानंतर चाहत्यांनी खूप टीका केली. या कामगिरीनंतरही त्याला २०२४ च्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाचा भाग बनवण्यात आले, त्यानंतर पीसीबी टीकाकारांच्या निशाण्यावर आली.
आझम खान याचे वजन ११० किलो आहे. आता T20 विश्वचषकामध्ये अमेरिकेविरुद्ध फ्लॉप ठरल्यानंतर त्याला भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्याच्या जागी इमाद वसीमला संधी देण्यात आली होती.