पाकिस्तानमध्ये सध्या चॅम्पियन्स वनडे कप २०२४ चा थरार सुरू आहे. पाकिस्तानचे अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. या स्पर्धेत एकूण ५ संघ सहभागी झालेले आहेत.
आता या स्पर्धेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक क्षेत्ररक्षक भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवसारखा झेल घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण त्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
वास्तविक, टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या फायनलमध्ये सूर्याने शानदार कॅच घेतला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सूर्याच्या झेलमुळेच टीम इंडिया जिंकली असे म्हणता येईल. सूर्याने हा झेल घेतला नसता तर कदाचित विश्वचषक गमावला असता.
कारण दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. तर सर्वोत्तम फिनीशर डेव्हिड मिलर याने हार्दिक पांड्याला लाँगऑफच्या दिशेने मोठा फटका मारला. यानंतर सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. या झेलमुळे भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला.
आता पाकिस्तानच्या चॅम्पियन्स एकदिवसीय चषक स्पर्धेत पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाने सूर्यकुमार यादवची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णपणे अपयशी ठरला. या अयशस्वी झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फलंदाज लाँग ऑफच्या दिशेने शॉट खेळतो आणि सीमारेषेजवळचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतो.
क्षेत्ररक्षक झेल घेतो, पण झेल घेताच तो सीमारेषेच्या आत जाऊ लागतो. मग फिल्डर बॉल बाहेर फेकण्याचा आणि पुन्हा झेल घेण्याचा विचार करतो, पण इथेच सगळा खेळ चुकतो.
सीमारेषेतून चेंडू बाहेर जाण्याऐवजी तो सीमारेषेच्या आत पडतो. यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला ६ धावा मिळाल्या. पँथर्स आणि डॉल्फिन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ही घटना घडली.