Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ३१ वा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कोलकाच्या इडन गार्डन्सवर खेळला जात आहे. हा सामना सुरू होताच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने नवा विक्रम आपल्या नावावर केला.
शाहीन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे.
शाहीन आफ्रिदीने ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० बळी पूर्ण केले आहेत. शाहीननंतर या यादीत दुसरा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे. स्टार्कने ५२ एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेण्याचा पराक्रम केला होता.
विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद विकेट नेपाळच्या संदीप लामिछानेने घेतले आहेत. संदीपने अवघ्या ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेतल्या होत्या. पण तो एक फिरकी गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत मिचेल स्टार्क अव्वल होता, मात्र आता शाहीनने त्याला मागे टाकले आहे.
जर आपण एकंदरीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पाहिले तर नेपाळचा क्रिकेटर संदीप लामिछानेचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. त्याच्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. राशीदने ४४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० विकेट घेतल्या आहेत.
आता या यादीत तिसरे नाव पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचे झाले आहे. शाहीनने ५१ एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर मिचेल स्टार्क या यादीत चौथ्या स्थानावर आहे, त्याने ५२ वनडे सामन्यात १०० बळी घेतले होते. त्याचबरोबर पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकचे नाव या यादीत पाचव्या स्थानावर आहे. सकलेनने ५३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० बळी घेतले होते.
संबंधित बातम्या