टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (१६ जून) ३६वा सामना पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात खेळला गेला. फ्लोरिडाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना १०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १०७ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान संघाला चांगलाच घाम गाळावा लागला.
चांगली गोष्ट म्हणजे कर्णधार बाबर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहिला आणि त्याने संघाला विजयापर्यंत नेले. पाकिस्तानचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला.
पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते. पहिल्या सामन्यात अमेरिकेने त्यांना पराभूत केले. यानंतर भारतीय संघाने दणका दिला. याच कारणामुळे पाकिस्तानचा संघ सुपर-८ साठी पात्र ठरू शकला नाही. पाकने त्यांचे शेवटचे दोन्ही सामने जिंकले.
१०७ धावांचे छोटे लक्ष्य मिळाल्यानंतर पाकिस्तान संघ सहज विजय मिळवेल असे वाटत होते, मात्र हा विजय त्यांना सहजासहजी मिळाला नाही. आयरिश गोलंदाजांनी आपली पूर्ण ताकद दाखवत पाकिस्तानला घाम गाळायला लावला. एकवेळ पाकिस्तान संघाने ९५ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या.
शेवटी पाकिस्तानला १२ चेंडूत १२ धावा हव्या होत्या. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने २ षटकार मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. कर्णधार बाबरने ३४ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला. शाहीनने ५ चेंडूत नाबाद १३ धावा केल्या. आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर कर्टिस कॅम्फरने २ बळी घेतले.
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि फिरकीपटू इमाद वसीमच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे पाकिस्तानने आयर्लंडला २० षटकांत ९ विकेट्सवर १०६ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय पाकिस्तानच्या बाजूने गेला आणि पहिल्याच षटकात शाहीनने आयर्लंडला २ धक्के देत त्यांचा डाव खिळखिळा केला.
आयर्लंडची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी ५ विकेट गमावल्या होत्या. मात्र, गॅरेथ डेलेनी आणि जोशुआ लिटल यांच्या संयमी खेळीमुळे संघाला १०० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.
पाकिस्तानकडून शाहीन आणि इमाद यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, तर आयर्लंडसाठी डेलनीने १९ चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर जोशुआ लिटलने २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १८ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.