रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिला डाव ४४८ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशनेही अप्रतिम कामगिरी करत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद ३१६ धावा केल्या होत्या. आता बांगलादेशचा संघ पाकिस्तानपेक्षा १३२ धावांनी मागे होता.
आता आज (२४ ऑगस्ट) चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाला असून बांगलादेशचे लिटन दास आणि मुशफिकूर रहीम फलंदाजी करत आहेत.
पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (२३ ऑगस्ट) बांगलादेशने २१८ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर मुशफिकुर रहीम आणि लिटन दास यांनी अर्धशतके झळकावली. दोघांमध्ये ९८ धावांची भागीदारी झाली. या दोघांनी अखेरच्या सत्रात पाकिस्तानी गोलंदाजांना प्रचंड थकवलं. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने १८ षटके टाकली, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.
हे वृत्त लिहिपर्यंत मुशफिकुर रहीम १२२ चेंडूत ५५ धावांवर लिटन दास ५८ चेंडूत ५२ धावांवर फलंदाजी करत आहेत. रहिमच्या बॅटमधून ७ चौकार आले. तर दासने ८ चौकार आणि १ षटकार मारला आहे. याआधी शाकिब अल हसन १५, मोमिनुल हक ५०, नझमुल हुसेन शांतो १६, झाकीर हसन १२ आणि शदमान इस्लाम ९३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.
याआधी पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने १७१ धावांची शतकी खेळी तर सौद शकीलने १४१ धावांची शतकी खेळी खेळली. तर सॅम अयुबने शानदार ५६ धावा केल्या. मात्र, अब्दुल्ला शफीक ०२ , शान मसूद ०६ आणि बाबर आझम शून्यावर बाद झाले. शाहीन आफ्रिदीने २९ धावांची आणि आगा सलमानने १९ धावांची खेळी खेळली.
पाकिस्तानी संघ कोणत्याही तज्ज्ञ फिरकीपटूशिवाय या कसोटीत उतरण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शान मसूदने संघात ४ वेगवान गोलंदाजांचा समावेश केला. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय आतापर्यंत पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने पार्ट टाईम फिरकी गोलंदाजांसह २० षटकेही टाकली. अशा परिस्थितीत मसूदच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.