रावळपिंडी हे शहर शोएब अख्तरमुळे प्रसिद्ध आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावरच त्याने रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख निर्माण केली. पण आज अख्तरच्या शहरात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजीच्या जोरावर एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आज (२४ ऑक्टोबर) गुरुवारपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजी करत आक्रमणाला सुरुवात केली.
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कसोटी सामन्यात एखाद्या कर्णधाराने पहिल्या डावातच दोन्ही बाजूंनी फिरकीपटूंसह सामना सुरू केला आहे. याशिवाय, कसोटी इतिहासात ही चौथी वेळ आहे, जेव्हा सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही बाजूंच्या फिरकी गोलंदाजांनी गोलंदाजी सुरू केली.
तसेच, पाकिस्तानने आणखी एक महापराक्रम केला आहे. त्यांनी तब्बल ८९ षटकांनंतर बॉलिंग चेंज केली आहे. वास्तविक, पाकिस्तानने गेल्या साममन्यात म्हणजेच, मुलतान कसोटीच्या दुसऱ्या डावात फिरकीपटू नौमान आणि साजीद खान यांनीच संपूर्ण गोलंदाजी करत इंग्लंडला ऑलआऊट केले होते.
आता रावळपिंडी कसोटीतही या दोघांनी गोलंदाजीची सुरुवात केली आणि दोघांनी मिळून जलळपास ३० षटके गोलंदाजी केली. यानंतर पाकिस्तानी कर्णधार शान मसूदने गोलंदाजीत बदल करत झादीद महमूदकडे चेंडू सोपवला.
भारत विरुद्ध इंग्लंड, कानपूर, १९६४
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, मीरपूर, २०१८
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, चितगाव, २०१९
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, रावळपिंडी, २०२४
फिरकी गोलंदाजांसह कसोटी सामन्याची सुरुवात प्रथम भारताने केली होती. इंग्लंड संघ तेव्हा भारत दौऱ्यावर होता आणि त्यावेळी मन्सूर अली खान पतौडी यांच्या संघाने क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन फिरकी गोलंदाजांसह डावाची सुरुवात केली. मोटागनहल्ली जयसिम्हा आणि सालिद दुर्रानी हे दोन फिरकी गोलंदाज होते.
त्यानंतर ५४ वर्षे कोणत्याही कर्णधाराने असे केले नाही. मात्र गेल्या ६ वर्षात जगातील तीन कर्णधारांनी याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.
२०१८ मध्ये, बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध मीरपूर कसोटीत असे केले, कसोटी इतिहासातील ही दुसरी घटना होती. यानंतर, पुढच्याच वर्षी २०१९ मध्ये चितगाव कसोटीत बांगलादेशने पुन्हा एकदा अफगाणिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली.
अशाप्रकारे, दोनदा फिरकी गोलंदाजीने कसोटी सामना सुरू करणारा हा एकमेव संघ आहे. आता २०२४ मध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना रावळपिंडी कसोटीत अशी कामगिरी करणारा चौथा संघ बनण्याचा मान पाकिस्तानने मिळवला आहे.