Pakistan might withdraw from Champions Trophy 2025: पाकिस्तानात पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने भारत आगामी आयसीसी स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, असे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. मात्र, आता पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात आयोजित केल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून माघार घेईल, अशी बातमी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीने दिली.
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नाही, असे पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. हायब्रीड मॉडेल स्वीकारले असते तर भारताने आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळले असते. मात्र, पाकिस्तान सरकार पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्यास सांगण्याचा विचार करत आहे, अशी माहिती समोर आली. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकार पीसीबीला आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) कोणत्याही स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास नकार देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र, अखेरीस हायब्रीड मॉडेलमध्ये भारताचे सामने श्रीलंकेत झाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये झाली होती. तेव्हापासून हे दोन्ही देश आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकात एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. पाकिस्तानने २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताचा दौरा केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आठ संघांची ही स्पर्धा पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. यजमान शहरे लाहोर, रावळपिंडी आणि कराची आहेत. मात्र, स्पर्धेचे भवितव्य सध्या अधांतरी आहे.
याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफनेही दावा केला होता की, जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आले नाहीतर, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेईल. १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सहयजमानपद पाकिस्तानने भूषवले होते आणि आयसीसीची ही शेवटची स्पर्धा आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.