Shoaib AKhtar On Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आतुर आहेत. त्याचबरोबर क्रिकेटचे दिग्गजही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार असून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू त्याबाबत सातत्याने भाकीत करत आहेत.
आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल, असा दावा अख्तरने केला. याशिवाय अख्तरने टीम इंडियाच्या पराभवाचा दावाही केला आहे.
शोएब अख्तरने एका संवादादरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला बघायचे आहे, असे तो म्हणाला.
सोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा आणि २०२३ च्या वर्ल्डकपचा बदला घ्यावा, असेही शोएब अख्तर म्हणाला.
अफगाणिस्तानची गणना कमकुवत संघांमध्ये केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानने आपण कोणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करून मोठी खळबळ उडवून दिली होती.
आता कोणताही संघ अफगाणिस्तानला हलक्यात घेत नाही. अफगाणिस्तान २०२३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु ग्लेन मॅक्सवेलच्या ऐतिहासिक खेळीने त्यांच्याकडून विजय हिसकावून घेतला.
याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये पाकिस्तान टीम भारताचा पराभव करेल असा दावाही अख्तरने केला आहे. २३ फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे.
मात्र टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल असा विश्वास शोएब अख्तरला आहे. शोएबला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा अंतिम फेरीत पाहायची आहे.
२३ फेब्रुवारीला पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी टीम इंडियाचा सामना २० फेब्रुवारीला दुबईतच बांगलादेशशी होणार आहे. २ मार्च रोजी भारतीय संघ न्यूझीलंडचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळणार आहे.
संबंधित बातम्या