पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मोठ्या वादात सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका चाहत्याशी भर रस्त्यात भांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका पार्कमधील असल्याचे दिसते.
हारिस रौफ पत्नीसोबत फिरत होता. तेव्हा कोणीतरी त्याच्यावर कमेंट केली. यामुळे रौफ संतप्त झाला आणि त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावला. रौफला रोखण्यासाठी त्याची पत्नी मागे धावली. पण हारिस रौफ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर तेथे मोठा जमावही जमला. रौफ आणि त्या चाहत्यामध्ये बराच वेळ वाद सुरू होता.
दरम्यान, हारिस रौफच्या या वादाचा व्हिडीओ काही वेळातच वाऱ्यासारखा सर्वत्र पसरला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हारिस रौफ याने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक लांबलचक पोस्ट लिहिली.
स्पष्टीकरण देताना रौफने लिहिले की, 'मी हे प्रकरण सोशल मीडियावर न आणण्याचा निर्णय घेतला होता, परंतु व्हिडिओ समोर आला. यावर माझे मत मांडणे महत्त्वाचे वाटले. सार्वजनिक व्यक्ती म्हणून आम्ही लोकांकडून सर्व प्रकारचे अभिप्राय प्राप्त करण्यास तयार आहोत. त्यांना आमचे समर्थन करण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकार आहे. पण, जेव्हा माझ्या पालकांचा आणि कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा मी त्यानुसार प्रतिक्रिया देण्यास मागेपुढे पाहणार नाही. लोक आणि त्यांच्या कुटुंबांबद्दल आदर दाखवणे महत्वाचे आहे, मग त्यांचा व्यवसाय कोणताही असो".
या व्हायरल व्हिडिओमध्ये काही आवाजही ऐकू येत आहेत. इंडियन होगा ये… असे म्हणताना हारिसचा आवाज येत आहे. नंतर तो चाहता म्हणतो, नाही पाकिस्तानी आहे मी."
दरम्यान, हारिस रौफला रोखण्यासाठी अनेक जण मधात आले. त्यातील काही आयसीसी टी-20 विश्वचषकाशीही जोडलेले दिसत होते. त्यांच्या गळ्यात आयसीसी ओळखपत्र होते. मग हारिस विचारतो - तुझ्या वडिलांनी तुला हेच शिक्षण दिले आहे का?" यानंतर उपस्थित लोकांनी दोघांनी बाजूला केले आणि वाद मिटवला.
संबंधित बातम्या