Arshad Khan Pakistan Cricketer : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केल्यानंतर संपूर्ण लाईफ सेट असते, असे अनेकांना वाटते. पण हे खरे नाही. जगात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतरही पोटापाण्यासाठी आज प्रचंड कष्ट करावे लागत आहेत. यात एका पाकिस्तान क्रिकेटरची सध्या चर्चा होत आहे. अर्शद खान असे त्या पाकिस्तान फिरकी फिरकी गोलंदाजाचे नाव आहे.
अर्शद खानने त्याच्या करिअरमध्ये सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि धोनीची विकेट घेतली आहे.
अर्शद खान कदाचित पाकिस्तान सोडून दुसर्या कुठल्यातरी देशाचा असता तर तिथे त्याला प्रचंड मान सन्मान मिळाला असता. त्याला कोचिंग टीममध्येही ठेवले गेले असते आणि त्याच्या अनुभवाचा फायदा दर्जेदार फिरकीपटू तयार करण्यासाठी घेतला गेला असता. पण पाकिस्तानमध्ये अर्शदच्या बाबतीत असे घडले नाही.
याच कारणामुळे पाकिस्तानी संघाचा एकेकाळचा स्टार आपली माती सोडून ऑस्ट्रेलियाला पोहोचला. ऑस्ट्रेलियात त्याने टॅक्सी चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह सुरू केला.
आज पाकिस्तानी क्रिकेटपटू जाहिरातींव्यतिरिक्त मॅच फी आणि लीग क्रिकेटमधून चांगली कमाई करतात, तर दुसरीकडे अर्शदला आपला देश सोडून परदेशात टॅक्सी चालवावी लागत आहे.
एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंना बाद करणारा अर्शद ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सची राजधानी सिडनीमध्ये उबर टॅक्सी चालक म्हणून काम करत आहे.
त्याच्या सहकाऱ्यांमध्ये ऑफी म्हणून ओळखल्या जाणार्या, फिरकीपटू अर्शद खानने १९९७-९८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आणि पाकिस्तानसाठी ९ कसोटी आणि ५८ एकदिवसीय सामने खेळले. पेशावरमध्ये जन्मलेल्या या ऑफस्पिनरने कसोटी क्रिकेटमध्ये ३२ विकेट घेतल्या, तर वनडमध्ये ५६ विकेट घेतल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्शदने १८७ सामन्यांमध्ये ६०१ बळी घेतले आहेत. ज्यात ८० धावात ८ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याचप्रमाणे अर्शदने १६३ लिस्ट-ए सामने आणि ९ टी-20 सामनेही खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे १८९ आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत.
इंडियन क्रिकेट लीग (ICL) या क्रिकेट स्पर्धेत सामील झाल्यावर अर्शद खानच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा आली आणि पाकिस्तानी संघात पुनरागमन करण्याच्या त्याच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या.
पाकिस्तानी टीममध्ये स्थान नाही मिळाल्यावर अर्शद खान याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. याच कारणामुळे तो पाकिस्तान सोडून ऑस्ट्रेलियाला (सिडनी) गेला, तिथे त्याने टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली.
एका क्रिकेट चाहत्याने त्याला २०२० मध्ये सिडनीमध्ये उबेरमध्ये गाडी चालवताना पाहिले होते, तो उदरनिर्वाहासाठी धडपड करत होता. अर्शद खानने सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ यांसारख्या दिग्गज भारतीय खेळाडूंना वेगवेगळ्या मालिकांमध्ये बाद केले आहे. अर्शदने शेवटचा वनडे आणि कसोटी सामना २००५ मध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळला होता.