pakistan cricket team training : आगामी टी-20 विश्वचषक (T20 world cup 2024) जवळ येत आहे आणि त्याआधी पाकिस्तानी संघाला न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबत T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत अबोटाबादमध्ये पाकिस्तानी संघाची फिटनेस ट्रेनिंग सुरू आहे. पण पाकिस्तानी टीमची ही फिटनेस ट्रेनिंग पद्धत सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ट्रेनिंगमध्ये रस्सीखेच, दगड उचलून धावणे, डोंगर चढणे आणि बंदुकीतून गोळीबार करणे यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी संघाचे हे असे प्रशिक्षण पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. अशा प्रशिक्षणाचे काय फायदे होतील याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र हे प्रशिक्षण शिबिर सोशल मीडियावर मोठ्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
वास्तविक, पाकिस्तानी लष्कराची एक टीम क्रिकेट संघाला प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा क्रिकेट खेळणार आहे की वेगळ्याच युद्धाची तयारी करत आहे, असे अनेक प्रश्न लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारू लागले आहेत.
विशेषत: बंदुकीतून फायरिंगचा आणि क्रिकेटचा संबंध काय असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या अशा प्रशिक्षणामुळे खेळाडूंना मानसिक बळ मिळेल, शरीरात लवचिकता येईल आणि त्यांना एक संघ म्हणून काम करण्यास मदत होईल, असे सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी म्हटले आहे.
तर टग ऑफ वॉर आणि डोंगर चढणे हा खेळ शारीरिक शक्तीशी संबंधित असू शकतो. अशा परिस्थितीत अनेक पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण चांगले असले तरी क्रिकेट प्रशिक्षण न घेतल्याने त्यांच्या खेळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
या दरम्यान, आझम खानचे वजन थोडे जास्त असल्याने तो डोंगर चढल्यावर इतर खेळाडूंनी त्याची मजा घेतली.
अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन आफ्रिदीला T20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवून बाबर आझमला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये पुन्हा कर्णधार बनवले आहे. २०२४ च्या T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ५ T20 सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका १८ एप्रिलपासून सुरू होणार असून २७ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
आता या अशा प्रशिक्षणाचा पाकिस्तानी संघाला फायदा झाला की नाही, हे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा निकालच सांगेल.