Champions Trophy 2025 Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानने त्यांचा संघ घोषित केला आहे. बाबर आझमसोबत मोहम्मद रिझवानचाही संघात समावेश आहे. रिझवानवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तो या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल.
अनुभवी खेळाडू फखर जमान देखील संघाचा भाग आहे. सलमान अली आगा आणि उस्मान खान यांनाही संधी देण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना होणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संध्याकाळी संघाची घोषणा केली. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चे विजेतेपद पटकावले होते. आता संघ पुन्हा एकदा विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. तर भारतीय संघ आपले सर्व सामने दुबई येथे खेळणार आहे.
पाकिस्तानचा संघ खूपच संतुलित दिसत आहे. बाबर आझम आणि फखर जमान हे अनुभवी खेळाडू संघात आहेत. फखर जमानने पाकिस्तानसाठी ८२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने ३४९२ धावा केल्या आहेत. त्याने द्विशतकही झळकावले आहे. कामरान गुलाम आणि सौद शकील यांनाही संघात स्थान मिळाले आहे. फहीम अश्रफ देखील पाकिस्तान संघाचा भाग आहे.
बाबर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानसाठी सलामीला खेळू शकतो. कारण संघात फखर जमान याच्या रुपाने एकच सलामीवीर दिसत आहे. सईम अयुब दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. अशा स्थितीत बाबर फखर जमानसोबत सलामीला खेळू शकतो.
पाकिस्तानचे गोलंदाजी आक्रमण खूपच मारक आहे. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह हे संघात आहेत. शाहीनने ५९ एकदिवसीय सामन्यात ११९ विकेट घेतल्या आहेत. त्यांच्यासोबत हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन यांनाही स्थान मिळाले आहे. स्पिनर अबरार अहमदही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन. , नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
संबंधित बातम्या