Asia Cup 2023 : नुकसान भरपाई द्या, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जय शाह यांच्याकडे पैशांची मागणी
PCB Demands Compensation From ACC : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आशियाई क्रिकेट परिषद (ACC) कडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आशिया कप 2023 चे सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केले जात आहेत.
PCB Demands Compensation From ACC : आशिया कप 2023 चा थरार सुरु आहे. यावेळी ही प्रतिष्ठित स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये हायब्रीड मॉडेलच्या आधारे आयोजित केली जात आहे. या दरम्यान, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया कपमधील श्रीलंकेत होत असलेल्या सामन्यामुळे झालेल्या नुकसानासाठी आशियाई क्रिकेट परिषदेकडे (ACC) भरपाईची मागणी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. पीसीबीने या प्रकरणी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नसले तरी बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी एसीसीचे प्रमुख जय शाह यांना औपचारिक पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. यासोबतच श्रीलंकेतील सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत एसीसीच्या वाईट वागणुकीबाबतही अश्रफ यांनी निराशा व्यक्त केली आहे.
सामने अखेरच्या क्षणी शिप्ट करण्याला जबाबदार कोण?
दरम्यान, सामने अखेरच्या क्षणी इतर मैदानांवर शिफ्ट करण्याच्या निर्णयवारही पीसीबी अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या औपचारिक पत्रात असेही म्हटले आहे की, "५ सप्टेंबर रोजी यजमान देश आणि ACC सदस्यांमध्ये बैठक झाली. यात कोलंबोत मुसळधार पाऊस होत असल्याने सामने हंबनटोटा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर श्रीलंकेचे मुख्य क्युरेटर खेळपट्टी तयार करण्यासाठी तेथून रवाना झाले होते. हंबनटोटा येथे मॅच टेलिकास्ट करण्याची यंत्रणाही लावण्यात आली. सर्व तयारी झाल्याचा मेलही ACC ने PCB ला पाठवला होता.
पण यानंतर काही दिवसांतच या मेलचा विचार करु नये, असे पीसीबीला सांगण्यात आले आणि कॅंडी आणि कोलंबो येथेच हे सामने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता सर्व बाबींवर झाका अश्रफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आशिया कप २०२३ मध्ये हे सामने होणे बाकी
९ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
१० सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
१२ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो
१४ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
१५ सप्टेंबर: भारत विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
१७ सप्टेंबर: फायनल, कोलंबो
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होतील)