Champions Trophy Stadiums : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, मात्र पाकिस्तानातील स्टेडियम परिपूर्ण नसल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानातील अपूर्ण स्टेडियमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
खरं तर, पाकिस्तानातील कराची आणि लाहोरमधील मोठ्या स्टेडियममध्ये बांधकाम सुरू आहे, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा स्थितीत आता स्पर्धा सुरू होईपर्यंत स्टेडियमचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र, या प्रश्नाचे उत्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी दिले आहे. मोहसीन नक्वी यांनी या स्टेडियमचे बांधकाम कधी पूर्ण होणार हे सांगितले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना पूर्ण विश्वास आहे की, या स्टेडियमचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. मोहसीन नक्वी म्हणाले की, सीमेपलीकडील लोक पाकिस्तानमधील स्टेडियम अपूर्ण असल्याचे सांगत आहेत, तसेच, स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून हलवावी, असे ते म्हणत आहेत. पण मी खात्री देऊ इच्छितो की हा मोठा इश्यू नाही. आमची स्टेडियम तिरंगी मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज आहेत.
तसेच, आमचे पंतप्रधान ७ फेब्रुवारीला लाहोर स्टेडियमचे उद्घाटन करतील, तोपर्यंत हे स्टेडियम पूर्णपणे तयार होईल, असेही नक्वी म्हणाले.
यासोबतच, कराची स्टेडियम आणि रावळपिंडी स्टेडियमच्या बांधकामाला थोडा वेळ लागेल असेही मोहसीन नक्वी म्हणाले. स्पर्धेनंतरही हे काम सुरूच राहणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १६ तारखेला लाहोर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, काही संघांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे, कर्णधारांची पत्रकार परिषद आणि फोटोशूट आयसीसी किंवा आम्हाला शक्य होणार नाही.
संबंधित बातम्या