पाकिस्तानी क्रिकेट संघाला वनडे आणि टी-20 चा नवा कर्णधार मिळाल्यानंतर आता नवा हेड कोचही सापडला आहे. गॅरी कर्स्टन यांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. पीसीबीने रेड बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनाच टी-20 आणि वनडे संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली आहे.
पीसीबीने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारी (२७ ऑक्टोबर) मोहम्मद रिझवान याला वनडे आणि टी-20 क्रिकेटचा कर्णधार बनवले. आता पीसीबीने संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचीही घोषणा केली आहे.
दरम्यान, यापूर्वी बोर्डाने आगामी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची निवड केली होती.
पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेसन गिलेस्पी हे पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असतील, अशी घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे. गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा दिला होता, तो स्वीकारण्यात आला आहे. "
यावर्षी कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत (PCB) दोन वर्षांचा करार केला होता, पण अवघ्या ६ महिन्यांतच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅरी कर्स्टन आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तसेच पीसीबीसोबत कोचिंग स्टाफच्या निर्णयांबाबत गंभीर मतभेद निर्माण झाले होते. कर्स्टन यांनी डेव्हिड रीड यांची हाय परफॉर्मन्स प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती, जी पीसीबीच्या प्राधान्यक्रमाशी सुसंगत नव्हती, यामुळे तणाव निर्माण झाला होता. बोर्डाने पर्यायी प्रस्ताव ठेवला होता, पण कर्स्टन यांना ते आवडले नाही.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर राहिलेले गॅरी कर्स्टन हे टीम इंडियाचेही मुख्य प्रशिक्षक होते. कर्स्टन यांच्या कार्यकाळात भारताने २०११ चा वनडे विश्वचषक जिंकला होता.
संबंधित बातम्या