सध्या पाकिस्तानचा संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. हा सामना रावळपिंडीत खेळला जात आहे. यजमान संघ या सामन्यात खूपच पिछाडीवर दिसत आहे. संघाची खराब स्थिती पाहून कर्णधार शान मसूद चांगलाच संतापलेला दिसला.
विशेष म्हणजे, कर्णधार शान मसूदच्या संतापाचे कारण बाबर आझम असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शान मसूद पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्याशी रागा रागात बोलत असल्याचे दिसत आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात वादावादी झाल्याचे दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर खूप निराश आहे, यामुळे त्याचा कोचसोबत वाद झाला.
रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कर्णधार शान मसूदला बाबर आझमची खराब फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अजिबात आवडले नाही, पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबर आझम २ चेंडूत शुन्यावर बाद झाला.
यानंतर बाबरने मैदानात मोठी चूक करताना एक सोपा झेल सोडला. यानंतर कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात वादावादी झाली. हा व्हिडिओ सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
२१ ऑगस्टपासून सुरू असलेल्या कसोटीचे ४ दिवस पूर्ण झाले आहेत. आज (२५ ऑगस्ट) सामन्याच पाचवा दिवस आहे. याआधी चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दिवसअखेर संघाने एक विकेट गमावली होती.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला.
त्यानंतर प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ धावा ठोकल्या आणि ११७ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. हे वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानचे ४४ धावात २ फलंदाज बाद झाले असून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक खेळत आहेत. कर्णधार शान मसूद १४ धावा आणि सॅम अयूब १ धाव करून बाद झाले. पाकिस्तान ७३ धावांनी पिछाडीवर आहे.