मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs NEP Asia Cup : बाबर-इफ्तिखारने नेपाळला चिरडले, सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा विक्रमी विजय

PAK vs NEP Asia Cup : बाबर-इफ्तिखारने नेपाळला चिरडले, सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा विक्रमी विजय

Aug 30, 2023 09:32 PM IST

pakistan vs nepal asia cup 2023 scorecard : आशिया कपचा पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे झाला. या सामन्यात पाकिस्तानने विक्रमी २३८ धावांनी विजय मिळवला.

pakistan vs nepal asia cup 2023
pakistan vs nepal asia cup 2023 (AFP)

pakistan vs nepal asia cup 2023 highlights : पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषक 2023 ची सुरुवात विक्रमी विजयाने केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार शतके झळकावली. या जोरावर पाकिस्तान संघाने २३८ धावांच्या फरकाने विक्रमी विजयाची नोंद केली.

ट्रेंडिंग न्यूज

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ २३.४ षटकांत १०४ धावांवर गारद झाला.

धावांच्या बाबतीत पाकिस्तानचा वनडेमधला हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. कर्णधार बाबर आणि इफ्तिखार अहमद यांनी पाचव्या विकेटसाठी १३१ चेंडूत २१४ धावांची भागीदारी केली. दोन्ही देशांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना होता आणि पाकिस्तानने नेपाळच्या गोलंदाजांच्या कमी अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला.

नेपाळचा डाव

धावांचा पाठलाग करताना नेपाळकडून सोमपाल कामीने २८ तर आरीफ शेखने २६ धावा केल्या. यानंतर गुलशन झा याने १२ धावा केल्या. या तिघांशिवाय नेपाळचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

तत्पूर्वी, पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी नेपाळच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले. संघाने १४ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. कुशल भुरटेल ८ धावांवर, आसिफ शेख ५ धावांवर आणि कर्णधार रोहित पौडेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. हारिसने ही भागीदारी तोडली. त्याने आरिफ शेखला बोल्ड केले.

आरिफ शेखला ३८ चेंडूत २६ धावा करता आल्या. यानंतर हरिसने सोमपालला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याला ४६ चेंडूत २८ धावा करता आल्या. त्यानंतर शादाब खानच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने ४ विकेट घेत नेपाळच्या खालच्या फळीला उद्ध्वस्त केले. गुलशन झा १३ धावा करून बाद झाले, दीपेंद्र सिंग ३ तर कुशल मल्ला ६ धावा करून बाद झाले, तर संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांना खातेही उघडता आले नाही.

पाकिस्तानकडून शादाबने ४ विकेट घेतल्या. त्याचवेळी शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यानंतर पाकिस्तानला आता पुढील सामना भारताविरुद्ध २ सप्टेंबरला खेळायचा आहे. त्याचबरोबर नेपाळचा पुढील सामना भारताविरुद्ध ४ सप्टेंबरला आहे.

पाकिस्तानचा डाव

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमान १४ धावा करून बाद झाला तर इमाम उल हक ५ धावा करून बाद झाला. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रिझवान ५० चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. यानंतर आलेला आघा सलमान ५ धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले.

बाबरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक झळकावले. १३१ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५१ धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी इफ्तिखारने ६७ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. इफ्तिखारने ७१ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. शादाब ४ धावा करून नाबाद राहिला. नेपाळकडून सोमपाल कामीने २ बळी घेतले. त्याचवेळी करण केसी आणि लामिछाने यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४