पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पाकिस्तानच्या संघाने तिसरा एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकला आणि यासह तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली.
पाकिस्तानच्या संघाने या मालिकेतील पहिला सामना गमावला, पण दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत मालिकाही जिंकली. तब्बल २२ वर्षांनंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभूत केले आहे.
कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवान याची ही पहिलीच मालिका होती. या मालिकेपूर्वी मोहम्मद रिझवानला पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडूच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी दुसरा सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकला आणि त्यानंतर तिसरा सामना पुन्हा पाकिस्तानच्या संघाने जिंकला.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम खेळून अवघ्या १४० धावांत गारद झाला. नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीने प्रत्येकी ३ बळी घेतले. या नंतर पाकिस्तानने २६.५ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. फलंदाजीत सॅम अयुबने ४२, अब्दुल्ला शफीकने ३७ धावा, बाबर आझमने नाबाद २८ आणि मोहम्मद रिझवानने नाबाद ३० धावा केल्या.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क फ्लॉप ठरला. त्याला नसीम शाहने बाद केले. एका चौकाराच्या जोरावर त्याला ९ चेंडूत केवळ ७ धावा करता आल्या.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला ॲरॉन हार्डीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. हार्दिकला शाहीन आफ्रिदीने बाद केले. तो १३ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ३६ धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कांगारूंना कर्णधार जोश इंग्लिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली.
जोश इंग्लिश १९ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने ७ धावा करून बाद झाला. नसीम शाहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हारिस रौफने सेट झालेल्या मॅथ्यू शॉर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ३० चेंडूत २२ धावा करून तो बाद झाला.
टॉप ऑर्डर पूर्ण फ्लॉप झाल्यानंतर शेवटची आशा मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून होती. पण हे दोन दिग्गजही पाकिस्तानी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. २५ चेंडूत ८ धावा करून स्टॉइनिस बाद झाला तेव्हा मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही.
ऑस्ट्रेलियाकडून सीन ॲबॉटने सर्वाधिक ३० धावा केल्या. लोअर ऑर्डर ॲडम झाम्पाने १३ धावांची आणि स्पेन्सर जॉन्सनने १२ धावांची नाबाद खेळी खेळली. या मालिकेत एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही.