इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बॅझबॉल स्टाइल क्रिकेट खेळून पाकिस्तानचा सहज धुव्वा उडवला.
यानंतर मालिकेतील दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तर तिसरा सामना सध्या सामना रावळपिंडीत खेळला जात आहे.
रावळपिंडीत इंग्लंडच्या बॅझबॉल स्टाइलची जादू चालली नाही. इंग्लंडच्या बॅझबॉल स्टाईलला पाकिस्तानने राहुल द्रविडच्या संयमी स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे.
वास्तविक, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना २४ ऑक्टोबरपासून रावळपिंडीत खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात ४६ धावांवर पाकिस्तानच्या ३ विकेट पडल्या होत्या.
पण या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (२५ ऑक्टोबर) अत्यंत महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानच्या सौद शकीलच्या बॅटमधून मोठी खेळी आली. त्याने कठीण परिस्थितीत शतक झळकावले आहे. २९ वर्षीय सौद शकीलने संयम दाखवला आणि एक टोक धरून फलंदाजी केली. त्याने १८१ चेंडूत चौथे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत केवळ ४ चौकार मारले.
मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सौद शकीलसारखी खेळी क्वचितच पाहायला मिळते. या कसोटी सामन्यापूर्वी, सौद शकीलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५३ च्या सरासरीने फलंदाजी करताना १२७२ धावा केल्या आहेत.
या फॉरमॅटमध्ये शकीलच्या नावावर ७ अर्धशतकेही आहेत. याशिवाय, त्याने पाकिस्तानसाठी १५ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये सौदने ३ अर्धशतकांच्या मदतीने ३१७ धावा केल्या आहेत.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या डावात ते ६८.२ षटकात २६७ धावा करत सर्वबाद झाले. पाहुण्या संघाकडून जेमी स्मिथने सर्वाधिक ८९ धावा केल्या.
त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. बेन डकेटनेही ५२ धावांची खेळी खेळली. गस ऍटकिन्सननेही ३९ धावांची चांगली खेळी केली. पाकिस्तानकडून साजिद खानने ६ विकेट घेतल्या. नोमान अलीने ३ बळी घेतले तर १ बळी जाहिद महमूदच्या खात्यात गेला.
संबंधित बातम्या