रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. आज (२ सप्टेंबर) सामन्याचा चौथा दिवस असून बांगलादेशने कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. तसेच, सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १८५ धावांचे आव्हान मिळाले. तसेच, सामन्याचा दीड दिवस शिल्लक आहे. पाकिस्तानचा दुसरा डाव १७२ धावांत गारद झाला. पाकिस्तानचे सर्वच फलंदाज फ्लॉप झाले. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. पाकिस्तानकडून विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान याने ४३ आणि सलमान आघा याने सर्वाधिक ४७ धावा केल्या.
तर स्टार फलंदाज बाबर आझम ११ आणि कर्णधार शान मसूद हा २८ धावा करून बाद झाले. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज हसन महमूद याने ४५ धावात ५ विकेट घेतल्या. तर नाहीद राणा याने ४३ धावात ४ विकेट घेतल्या.
पाकिस्तानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने हे वृत्त लिहिपर्यंत ५ षटकात बिनबाद ३७ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सॅम अयुब, शान मसूद आणि सलमान आगा यांनी अर्धशतके झळकावली. पाकिस्तान पहिल्या डावात २७४ धावांवर सर्वबाद झाला.
पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २७४ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने २६२ धावा केल्या. या डावात बांगलादेशकडून विकेटकीपर फलंदाज लिटन दासने शतक केले. लिटन दासने २२८ चेंडूत १३८ धावांची खेळी केली. तर मेहदी हसन मिराज याने ७८ धावा केल्या.
विशेष म्हणजे, या डावात बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली होती. त्यांचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत तंबूत परतले होते. मात्र, यानंतर विकेटकीपर फलंदाज लिटन दास आणि मेंहदी हसन मिराज यांनी सावध खेळी करत संघाला सावरले. दोन्ही खेळाडूंमध्ये १६५ धावांची भागीदारी झाली.